नळदुर्ग (प्रतिनिधी)- नळदुर्ग -तुळजापुर रस्त्यावर नळदुर्गजवळील कचरा डेपोसमोर दि. 8 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 ते 12.30 च्या सुमारास कार आणि टमटम यांच्या समोरासमोर धडक होऊन झालेल्या भिषण अपघातामध्ये 1 महिला भाविक ठार तर 10 ते 12 जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर नळदुर्ग येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना सोलापुर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
नळदुर्ग -तुळजापुर रस्त्यावर नळदुर्ग जवळील कचरा डेपोसमोर कार क्र. के.ए. 03 एम आर 0441 आणि टमटम क्र. एम. एच. 25 एम 676 यांच्यात दि. 8 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 ते 12.30 च्या दरम्यान समोरासमोर धडक होऊन भिषण अपघात झाला आहे. कार मधील प्रवाशी आई तुळजाभवानीचे दर्शन घेऊन कर्नाटक राज्यातील बिदर तालुक्यातील कामठाण या आपल्या गावी चालले होते. तर टमटम मधील प्रवाशी जेवळी येथुन चिवरीच्या महालक्ष्मीचे दर्शन घेण्यासाठी चिवरीकडे चालले होते. नळदुर्गजवळील कचरा डेपोसमोर ओव्हरटेक करण्याच्या नादात हा अपघात झाला आहे.
अपघात स्थळी नळदुर्ग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांनी भेट दिली. या अपघातामध्ये सोजारबाई तिप्पना कोराळे वय 70 वर्षे रा. जेवळी यांचा मृत्यु झाला आहे. तर रागीन अरुण हावळे वय 32, सविता गुणवंत हावळे वय 48, शामल विश्वनाथ हावळे वय 50, सिंधुबाई काशिनाथ गुंजोटी वय 60, भागीरथी सदाशिव हावळे वय 65 सर्व रा. जेवळी यांच्यासह 10 ते 12 जण जखमी झाले आहेत.