नळदुर्ग (प्रतिनिधी)- तीन महिन्यांपासुन तुळजापुर तालुक्यातील निराधार योजनेतील 24 हजार लाभार्थ्यांच्या पगारी थकीत असल्यामुळे निराधारांची दिवाळी यावर्षी अंधारात साजरी होणार का? प्रशासनाने तात्काळ दिवाळीपुर्वी निराधारांच्या पगारी करून त्यांना दिलासा द्यावे अशी मागणी होत आहे.

तुळजापुर तालुक्यात श्रावणबाळ वृद्धापकाळ योजना, इंदिरा गांधी निराधार योजना व संजय गांधी निराधार योजना या योजनेअंतर्गत अंदाजे 24 हजार लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांना शासनाकडुन दरमहा 1500 रुपये दिले जाते. निराधार नागरीकांना हा एक मोठा दिलासा आहे. या पैशावरच निराधार व्यक्तींचा उदरनिर्वाह चालतो. मात्र गेल्या तीन महिन्यांपासुन या निराधार व्यक्तींना पगार मिळाला नाही त्यामुळे अनेक निराधार व्यक्तींची यामुळे उपासमार होत आहे. अनेक निराधार लाभार्थी फक्त या निराधार योजनेच्या पगारीवरच आपले जीवन जगतात. मात्र गेल्या तीन महिन्यांपासुन निराधार व्यक्तींना पगारी मिळाल्या नाहीत. सध्या सणासुदीचे दिवस आहेत त्यामुळे निराधार योजनेतील लाभार्थ्यांना वेळेवर पगार मिळणे गरजेचे आहे. दिवाळी अगदी तोंडावर आली आहे. त्यामुळे निराधार लाभार्थ्यांच्या पगारी तात्काळ होणे गरजेचे आहे. शासनाने दिवाळीपुर्वी तुळजापुर तालुक्यातील निराधार योजनेतील लाभार्थ्यांच्या पगारी करावेत अशी मागणी होत आहे.


 
Top