तेर (प्रतिनिधी)-धाराशिव तालुक्यातील तेर येथील जिल्हा परिषद कन्या शाळेत राष्ट्रीय पोषण माह निमित्ताने जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळा तेर येथे पाककला स्पर्धा व रान भाज्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष काकासाहेब मगर यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. इयत्ता पहिली ते सातवी वर्गातील सर्व विद्यार्थीनींनी उत्स्फूर्तपणे यामध्ये सहभाग घेतला.तृणधान्य, कडधान्य यापासून धपाटे, पराठे, इडली सांबर, शिंगोळे, आळण, भाकरी चटणी, लोणचे, दही अशा विविध स्वादिष्ट पदार्थ व रानभाज्या यांची कल्पकतेने सुबक सजावट केली. प्रत्येक पदार्थ व त्यातील घटक व पोषकता याबद्दल विद्यार्थीनीनी माहिती सांगितली. मुख्याध्यापिका सुरेखा कदम यांच्या संकल्पनेतून दप्तराविना शनिवार चा उपक्रम व राष्ट्रीय पोषण माहचे औचित्य साधून सही पोषण देश रोषण विद्यार्थ्यांना व पालकांना सकस व पोषक आहार, रानभाज्या यांचे महत्त्व व गरज यांची माहिती व्हावी. या हेतूने ही स्पर्धा व प्रदर्शन भरवण्यात आले होते. यावेळी प्रतिभा जोगदंड यांनी सुंदर फलक लेखन व धान्यांची सुबक रांगोळी काढली होती.सुशिल क्षिरसागर यांनी सूत्रसंचलन केले.मालोजी वाघमारे, ज्योती गाढवे,काशिनाथ नरसाळे , किरण फंड यांनी परीक्षक म्हणून काम केले व विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन कौतुक करण्यात आले.उपस्थित मान्यवर व पालकांनी विद्यार्थ्यांनी पदार्थांचा आस्वाद घेतला.
पाक कला स्पर्धेतील विजेते-इयत्ता 5 वी ते 7 वी गटात प्रथम आचल देवकुळे, द्वितीय सफाई शेख, तृतीय नेहा पवार, उत्तेजनार्थ राजनंदिनी फासे, इयत्ता 1 ली ते 4 थी गटात - प्रथम सिद्धधी पवार, द्वितीय आराध्या भातभागे, तृतीय श्रेया वाघमारे विजेते ठरले.