धाराशिव (प्रतिनिधी)- कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गत महाविकास आघाडी सरकारच्या काळात सिंचन मंत्री जयंत पाटील यांची भेट घेवून मी व आमदार कैलास पाटील यांनी या कामाचा प्राधान्यक्रम ठरविला होता. त्याप्रमाणे 840 कोटी रूपये उपलब्ध करून दिले होते. त्यानुसार काम झाले असते तर 2023 मध्येच पाणी असले असते. परंतु भाजपचे सरकार आल्यानंतर त्यांनी आठकाठी केली. त्यामुळेच मराठवाड्याचे हक्काचे पाणी येण्यास उशीर लागत आहे. अशी घणाघाती टिका खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत केली. 

सोमवार दि. 7 ऑक्टोबर रोजी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेस आमदार कैलास पाटील उपस्थित होते. पुढे बोलताना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे नाव न घेता टिका करताना काही लोक न केलेल्या कामाचे श्रेय घेण्यासाठी फार मोठा दिखावा करतात. गेल्या 40 वर्षात विकास कामे केली असती तर सगळ्यात जास्त शेतकरी आत्महत्या करणार जिल्हा म्हणून धाराशिव जिल्ह्याचे नाव पुढे आले नसते. असे खासदार ओमराजे यांनी सांगितले. 4 हजार 700 कोटींचा कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प वेळेवर काम न झाल्याने 12 हजार कोटी रूपयांवर गेला आहे. 


हक्काचे पाणी मिळण्यास उशीर

मराठवाड्याचे हक्काचे पाणी मिळावे यासाठी कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचे काम जोरात सुरू असतानाच भाजपच्या काही लोकांनी त्यात काही लोकांनी आठकाठी आणली आहे. त्यामुळे हक्काचे पाणी मिळण्यास उशीर झाला आहे. सध्या फक्त 21 टीएमसी पाण्याचे नियोजन न करता 7 टीएमसी पाण्याचे नियोजन करूनच काम चालू असल्याचा गंभीर आरोप आमदार कैलास पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे. महायुती सरकारला धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खरे काही करायचे असेल तर आचार संहिता लागू होण्यापूर्वी कृष्णा मराठवाडा संचिन प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून द्या असे आवाहन आमदार पाटील यांनी केले. शेतकऱ्यांचे भूसंपादनाचे पैसे दिले नाहीत. सिंदफळ पंप हाऊसला वीज कनेक्शन नाही. मोठ्या प्रमाणात काम अपुरे असताना उद्घाटन व पाहणी दौरा कशाचा करता? असा प्रश्नही आमदार पाटील यांनी उपस्थित केला आहे.

 
Top