धाराशिव (प्रतिनिधी) - सर्वत्र वारे व पाऊस मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे विद्युत प्रवाह कमी जास्त दाबाने होत असल्याने अनेक ठिकाणी शॉर्ट सर्किट होत आहे. अशाच एका शॉर्ट सर्किटमुळे कृषी अग्रो एजन्सी निविष्ठाचे दुकान जळून खाक झाले आहे. त्यामुळे दुकानातील पीओपी, रासायनिक खते व इतर साहित्य मिळून जवळपास 7 ते 8 लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची दुर्दैवी घटना धाराशिव तालुक्यातील चिलवडी येथे दि.26 सप्टेंबर रोजी घडली.
धाराशिव तालुक्यातील चिलवडी येथील औदुंबर मधुकर जाधव (वय 28 वर्षे) व्यवसाय- व्यापारी यांचे धाराशिव वैराग रोड लगत तिरूमला तिरुपती ॲग्रो एजन्सी हे दुकान आहे. हे दुकान दि.26 सप्टेंबर रोजी दुकान बंद केल्यानंतर रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास इलेक्ट्रिक शॉर्ट होऊन दुकानातील एक संगणक, दुकानास केलेली पीओपी, रासायनिक खते, आरसीएफ कंपनीचा युरिया, कोरोमंडल कंपनीचा सुपर खत, रासायनिक औषधे, शेती कामांसाठी वापरण्यात येणारे बी-बियाणे, पॉस मशीन, डी फ्रिज, अलमारी रॅक आदींसह इतर साहित्य आगीच्या भक्षस्थानी पडून त्याचा कोळसा झाला आहे. त्यामुळे या आगीत जवळपास 7 ते 8 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत ग्रामीण पोलीस ठाण्यास कळवताच संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळी जाऊन पंचासमक्ष नुकसानीचा पंचनामा केला आहे. या प्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास तपास अधिकारी पोहेकॉ व्ही.जी. मुल्ला हे करीत आहेत.