धाराशिव (प्रतिनिधी) - जिल्ह्यातील 57 पैकी 33 महसूल मंडळात सततच्या पावसाने झालेल्या पीक आणि शेतीच्या नुकसानीचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला आहे. त्याव्यतिरिक्त अन्य महसूल मंडळातही मोठे नुकसान झाले आहे. भूम, परंडा, तुळजापूर आणि धाराशिव तालुक्यातील वगळण्यात आलेल्या बहुतांश महसूल मंडळातही मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे सततच्या पावसाचे निकष शिथील करावे. पाच दिवसांत 50 मिलीमीटर किंवा त्यापेक्षा अधिकचा पाऊस झाल्यासही पिकांचे नुकसान होते, हे गृहित धरून शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीअंतर्गत मदत देण्यात यावी. आचारसंहिता काळातही नियमानुसार निवडणूक आयोगाच्या परवानगी घेऊन मदत देता येऊ शकते त्यासाठी आपण मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या प्रधान सचिवांकडे पाठपुरावा करीत असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.
जिल्ह्यातील 57 पैकी 33 महसूल मंडळात अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे नुकसान झाले असल्याचे अहवालात नमूद केल्याची बाब लक्षात आल्यानंतर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी प्रधान सचिव मदत व पुनर्वसन यांना 18 ऑक्टोबर रोजी पत्र लिहून जिल्ह्यातील अन्य महसूल मंडळातील वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली आहे. धाराशिव, भूम, परंडा आणि तुळजापूर तालुक्यातील 24 महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद नाही. मात्र झालेले नुकसान मोठे आहे. अनेक ठिकाणी सदोष पर्जन्यमापकांमुळे अतिवृष्टी असतानाही ती नोंदविली गेलेली नाही. त्यामुळे 2022 साली ओढवलेल्या आपत्तीवेळी नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल ज्याप्रमाणे शासनाकडे सादर करण्यात आला होता, अगदी तीच प्रक्रिया अनुसरून नुकसानीची व्याप्ती लक्षात घेणे अत्यावश्यक आहे. त्यानुसार उर्वरित 24 महसूल मंडळात दोन वर्षापूर्वी ज्याप्रमाणे वस्तुनिष्ठ नुकसानीच्या निकषानुसार केलेल्या पाहणीचा अहवाल ग्राह्य धरला होता, अगदी त्याप्रमाणेच 24 महसूल मंडळातील शेतकऱ्यांनाही तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी, असेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी या पत्रात नमुद केले आहे.