धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या तयारीसाठी 2075 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. त्यांना योग्य ते प्रशिक्षणही देण्यात येत आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संजय पाटील यांनी दिली.
विधानसभा निवडणुकीची माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मृणाल जाधव, आचारसंहिता प्रमुख, गटविकास अधिकारी आर. बी. चकोर आदी उपस्थित होते. पाटील म्हणाले की, निवडणुकीची प्राथमिक तयारी पूर्ण झाली आहे. दि. 22 ऑक्टोबर रोजी अर्ज विक्री व दाखल करण्यास सुरूवात होत आहे. सर्व राजकीय पक्षांची बैठक घेत सुचना दिल्या.
मतदारसंघात एकूण 3 लाख 79 हजार 283 मतदार आहेत. यात 1 लाख 76 हजार 303 महिला आहेत. यावेळी विशेष बुथची रचना केली. त्यात पिंक बूथ धाराशिवच्या सरस्वती प्रशालेत असणार आहे. येथे महिला कर्मचारी कामकाज बघतील, युथ बूथवर निवडणूक अधिकाऱ्यापासून ते शिपायापर्यंत कर्मचारी 25 वयोगटाच्या आतील असतील. हा बूथ लिटल स्टार शाळेत, तसेच दिव्यांग कर्मचारी असलेले बुथ बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात असेल. रामनगर व गोविंदपूर (ता. कळंब) येथील बुथ संवेदनशील असून, येथे अधिकचा पोलिस बंदोबस्त असणार आहे. मतदारसंघात एकूण 416 मतदान केंद्र असून, यामध्ये 110 शहरी भागात तर 306 ग्रामीण भागात आहेत.
उमेदवारी अर्ज 100 रूपयांना असून, त्याची विक्री व स्वीकृती मंगळवारपासून होणार आहे. 29 तारखेपर्यंत याला मुदत असून, सकाळी 11 ते 3 याला वेळ आहे. सुटीच्या दिवशी अजृ विक्री व स्वीकृती बंद असेल. धाराशिवचे अर्ज तहसील कार्यालयात स्विकारले जाणार आहेत. तेथे सात टेबल असून, प्रत्येक टेबलवर 4 ते 5 कर्मचारी वेगवेगळे काम करतील. यामध्ये अर्ज स्विकृती, अनामत रक्कम स्विकारणे, ऑनलाईन तपासणी करणे, मतदार यादीत नाव तपासणे आदी कामे केली जाणार आहेत असेही त्यांनी सांगितले.
मतदारसंघात सर्व प्रकारची तपासणी, आचार संहितेसंदर्भातील तक्रारींचा निपटारा करण्यासाठी 9 भरारी पथके नियुक्त केली आहेत. तसेच सभेच्या ठिकाणी भेट देण्यासाठी 2 पथकांची नियुक्ती असणार आहे. यामध्ये आणखी वाढ करण्यात येईल. सोशल मीडियावरही आचारसंहिता पथकाची नजर असणार आहे. असेही यावेळी पाटील यांनी सांगितले.