धाराशिव (प्रतिनिधी)-  कलाविष्कार अकादमी,साहित्य भारती आणि म.सा.प.यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित  “तिच्या कविता“ या युवराज नळे रौशन लिखित काव्यसंग्रहाचा भव्य आणि बहारदार सोहळा तुळजाभवानी स्टेडियम सभागृहात संपन्न झाला. स्रीमनाचे हळवे भावविश्व उलगडणा-या, नाती मैत्री प्रीतीच्या नाजूक रेशीमगाठी जपणा-या आणि प्रसंगी सामाजिक जाणीवांनाही प्रखरतेने मांडणा-या 'तिच्या कविता “ ....या काव्य संग्रहाच्या प्रकाशऩाला ती ला केंद्रस्थानी ठेऊन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रकाशन सोहळा सुवर्णा पवार (सुप्रसिद्ध लेखिका तथा उपआयुक्त महिला व बालकल्याण विभाग महाराष्ट्र शासन) यांच्या शुभहस्ते व जेष्ठ लेखिका कमलताई नलावडे, शास्त्रज्ञ डॉ.हेमा शिराळ होगाडे, भरोसा सेल प्रमुख पोलिस उपनिरीक्षक अनघा गोडगे आणि वर्षा नळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

आज स्रीबाबतीत जे शारीरिक आणि मानसिक हिंसाचार होत आहेत त्यामुळे भयभीत ,अस्थिर ,असुरक्षित झालेल्या समाजमनावर सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी मुलींना आणि महिलांना  स्वसंरक्षण करता यावे निर्भयपणे जगता यावे या उद्देशाने युवराज नळे यांनी मोफत मुली आणि महिलांसाठी कराटे आणि तायक्वांदो प्रशिक्षण सुरू केले आहे. या मुली आणि महिला प्रशिक्षणार्थींची उपस्थिती ही कार्यक्रमाची विशेष उल्लेखनीय बाब होती. यावेळी युवराज नळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

सर्व अतिथी महिला, कार्यक्रमाची सुरुवात गायिका शर्वरी डोंगरे हिने गायलेल्या स्वागतगीताने झाली. कार्यक्रमाचे ओघवते सूत्रसंचालन प्रगती शेरखाने हिने केले. पाहुण्यांचा परिचय सुषमा सांगळे यांनी करून दिला. तर आभारप्रदर्शन अश्विनी धाट यांनी केले. असा हा महिला सन्मानाचा आगळावेगळा उपक्रम उपस्थितांना पाहण्यास मिळाला. 

 
Top