धाराशिव (प्रतिनिधी)-डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत दिलेले धनगर समाजाचे एसटी आरक्षण देण्याच्या मागणीसाठी व पंढरपूर येथे गेल्या 13 दिवसापासून सुरू असलेल्या आमरण उपोषणास पाठिंबा देण्यासाठी सकल धनगर समाजाच्यावतीने धाराशिव शहराच्या जवळ असलेल्या हातलाई तलावात 25 ते 30 धनगर समाज बांधवांनी जलसमाधी आंदोलन केले. शेवटी डीवाय एसपी राठोड व तहसीलदार जाधव मॅडम यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन व आंदोलन बाबतची माहिती सरकारला त्वरीत कळवू असे सांगितल्याने दुपारनंतर आंदोलन मागे घेतले.
सकाळी 11 वाजल्यापासून आंदोलनकर्ते एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी करत हातलाई तलावात उड्या मारल्या. यामध्ये शाम तेरकर, राजू मैंदाड, समाधान पडुलकर, सुभाष मैंदाड, डॉ. काकासाहेब सोनटक्के, गणेश सोनटक्के, सुरेश शिंदे, हजारे, गणेश एडके यांच्यासह 25 ते 30 युवकांनी जलसमाधी आंदोलनासाठी तलावात उड्या मारल्या. जिल्हा प्रशासनाच्यावतीने तहसीलदार जाधव, पोलिस विभाग त्याचप्रमाणे आपकालीन व्यवस्था व ॲब्युलस आंदोलन स्थळी ठाण मांडून होते. सकाळी सुरू झालेले हे आंदोलन अखेर दुपारनंतर डीवायएसपी राठोड यांच्या उपस्थितीमध्ये संपले. जिल्हा प्रशासनाच्यावतीने तहसीलदार जाधव मॅडम यांनी सरकारला या आंदोलनासंदर्भात माहिती देण्यात येईल असे सांगितले.
यावेळी प्रा. सोमनाथ लांडगे, डॉ. स्नेहा सोनकाटे, लिंबराज डुकरे, संतोष वतने, सक्षणा सलगर, राहुल काकडे, बालाजी तेरकर, किशोर डुकरे, दत्तात्रय दाणे यांच्यासह सकल धनगर समाजाचे लोक उपस्थित होते.