मुरुम, (प्रतिनिधी) : येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिन मंगळवारी (ता. २४) रोजी साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माधवराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक सपाटे होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. प्रतापसिंग राजपूत, प्रा. अशोक बावगे, प्रा. राजकुमार रोहीकर, डॉ. पुरुषोत्तम बारवकर, डॉ. सुभाष हुलपल्ले, डॉ. रविंद्र गायकवाड, प्रा. गोपाळ कुलकर्णी, डॉ. विनायक रासुरे, डॉ. महेश मोटे, डॉ. सुधीर पंचगल्ले, डॉ. नागनाथ बनसोडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.                               

डॉ. राजपूत बोलताना म्हणाले की, भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू कारकिर्दीत डॉ. ही. डी. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेण्यात आली होती. त्याचा प्रमुख उद्देश उच्च शिक्षण घेत असणाऱ्या युवकांनी राष्ट्रीय उभारणीत योगदान दयावे. या योजनेची सुरुवात महात्मा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त करण्यात आली. २४ सप्टेबर १९६९ रोजी या योजनेची सुरुवात करण्यात आली. पहिल्या वर्षी संपूर्ण भारतभर ३७ विद्यापीठे व ४० हजार विद्यार्थ्यांनी सुरू झालेल्या योजनेत आज मितीला ४०२ विद्यापीठे १६३३० महाविद्यालये व १९९९४ उच्च माध्यमिक विद्यालये सहभागी आहेत. या योजनेचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी आपला सर्वांगीण विकास घडवून समाजात एक आदर्श नागरिक म्हणून प्रतिनिधित्व करावे. राष्ट्रीय सेवा योजनाचे ब्रीदवाक्य Not me but you माझ्यासाठी नव्हे तर तुमच्यासाठी हे आपल्याला लोकशाही सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देते. नि:स्वार्थ सेवेची गरज जाणून देते. राष्ट्रीय सेवा योजनेचे बोधचिन्ह हे ओडिसा राज्यातील कोणार्क येथील सूर्य मंदिराच्या रथाच्या चक्रावर आधारित आहे. चक्र हे गतीचे प्रतीक आहे. यामध्ये असणारा लाल रंग हे युवकाचे सळसळते रक्त आहे. राष्ट्रीय सेवा योजना ही एक चळवळ आहे. त्यामध्ये सेवा व त्याग हा महत्त्वाचा भाग आहे. शिक्षणातून सेवा संस्कार  व्हावा. तरुणांकडून राष्ट्रसेवा घडावी, युवाशक्तीचा उपयोग राष्ट्राला व्हावा या हेतूने राष्ट्रीय सेवा योजनेची निर्मिती झाली. या निमित्ताने राष्ट्रीय सेवा योजनेच्या मार्फत स्वच्छता रॅलीमार्फत घरोघरी जनजागृती करण्यात आली.  अध्यक्षीय समारोपात प्राचार्य सपाटे म्हणाले की, युवकांनी शिक्षणाबरोबर आपले व्यक्तिमत्व घडविताना युवकांमध्ये राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्मसमभाव, सहिष्णुता, सामाजिक बांधिलकी याकरिता स्वयंसेवक तत्पर व सक्षम व्हावा या उद्देशाने राष्ट्रीय सेवा योजनेची स्थापना करण्यात आल्याचे मत व्यक्त केले.  प्रास्ताविक प्रा. डॉ. रमेश आडे यांनी केले.  

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. किरण राजपूत तर आभार प्रा. डॉ. नागोराव बोईनवाड यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक, स्वयंसेवक विद्यार्थी यांनी पुढाकार घेतला.     

 
Top