तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील मौजे इटकळ येथील शेतकरी अंबादास भानुदास हाके यांच्या पाच एकर क्षेत्रातील सोयाबीनच्या गंजीस अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची घटना शुक्रवारी (दि. 10 ऑक्टोबर) मध्यरात्री घडली. या आगीत संपूर्ण सोयाबीन ढीग, प्लास्टिक पाईप व दोन ताडपत्री जळून खाक झाले असून, शेतकऱ्याचे जवळपास अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
ही घटना मौजे इटकळ शिवारातील गट क्रमांक 55 येथे घडली. शेतकरी हाके यांनी गेल्या दहा दिवसांपासून पत्नीच्या सहकार्याने पाच एकर सोयाबीनचे पीक काढून शेतातच गंजी करून ठेवली होती. मात्र मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने आग लावल्यानंतर क्षणात होत्याचं नव्हतं झालं. घटनेची माहिती मिळताच कृषि अधिकारी कुलकर्णी, तलाठी तोडकरी, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीपान कोळी, पोलीस पाटील विनोद सलगरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत नुकसानीचा पंचनामा केला. पंचनाम्यात दोन हेक्टरवरील सोयाबीनसह प्लास्टिक पाईप व ताडपत्री जळून गेले असल्याचे नमूद करण्यात आले. या वेळी ग्रामविकास अधिकारी नितीन कांबळे, उपसरपंच फिरोज मुजावर, माजी सरपंच अरविंद पाटील, राहूल बागडे, श्रीकृष्ण मुळे, राम मंडलिक, सूर्यभान सावंत आदी ग्रामस्थ उपस्थित होते. या आगीत शेतकरी हाके यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून त्यांना शासकीय पातळीवर तात्काळ मदत मिळावी, अशी मागणी स्थानिक शेतकरी वर्गाने केली आहे.