वाशी (प्रतिनिधी): तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकरी हवालदिल झाले असून अनेकांच्या शेतीसह घरे आणि पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेनेतर्फे “हंबरडा मराठवाडा व्यापी आंदोलन” अंतर्गत वाशी तहसील कार्यालयावर तीव्र निदर्शने करण्यात आली.

या आंदोलनात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 मदत द्या, पूरग्रस्तांना पशुधन भरपाई द्या, तसेच संपूर्ण कर्जमाफी लागू करा अशा प्रमुख मागण्यांचा समावेश होता. यावेळी शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत सरकारच्या निष्क्रीय भूमिकेचा निषेध नोंदवला. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी धाराशिव जिल्ह्यातील इटकुर, पारगाव येथे भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत, “आत्महत्या करू नका  आम्ही तुमच्या पाठीशी आहोत” असा दिलासा दिला होता. त्याच पार्श्वभूमीवर हे आंदोलन हाती घेण्यात आले.

नायब तहसीलदार पूजा पाटील यांना या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. प्रमुख मागण्यांमध्ये खालील बाबी नमूद करण्यात आल्या. ओला दुष्काळ तात्काळ जाहीर करावा, प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी 50,000 मदत द्यावी, पुराने वाहून गेलेल्या जनावरांची बाजारभावाप्रमाणे भरपाई मिळावी, नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांचे कर्ज तात्काळ माफ करावे, पिक विमा निकष शिथिल करून थेट रक्कम खात्यात जमा करावी, घरे व पशुधनाचे नुकसान झालेल्यांना जुने निकष न लावता योग्य मोबदला द्यावा, या प्रसंगी तालुका प्रमुख तात्यासाहेब गायकवाड, माजी नगराध्यक्ष निचित चेडे, युवासेना विधानसभा प्रमुख ॲड. महेश आखाडे, शहरप्रमुख अनिल गवारे, तसेच किशोर भांडवले,दशरथ नाळपे, अरुण नलवडे, अनिल क्षिरसागर, संतोष चेडे, अमोल चेडे,सुधीर गवारे, विकास गायकवाड, बालाजी कवडे, विशाल कवडे, रोहन मोळवणे, आदींसह शेकडो शिवसैनिक आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top