वाशी (प्रतिनिधी)- तालुक्यातील जानकापूर आणि पारगाव परिसरातील पूरग्रस्तांना मदतीचा हात देत पुणे जिल्ह्यातील जाधववाडी येथील ज्ञानाई शिक्षण संस्थेचे कै. जगन्नाथ तुकाराम राऊत प्राथमिक विद्यालय व ज्ञानज्योती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, चिखली (ता. हवेली) येथील विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकीचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले आहे.
नुकत्याच झालेल्या महापुरामुळे अनेक नागरिकांचे घर, अन्नधान्य व शैक्षणिक साहित्य वाहून गेले. या संकट काळात शाळेतील विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि संस्था यांनी एकत्र येत अन्नधान्य, कपडे, जीवनावश्यक वस्तू आणि शैक्षणिक साहित्य गोळा करून पूरग्रस्त भागात वाटप केले.
या उपक्रमात संस्थेचे अध्यक्ष राहुल राऊत, सचिव शकुंतला राऊत, सदस्य सोमनाथ राऊत, कांचन राऊत, संतोष पगडे तसेच शिक्षक व विद्यार्थी सक्रियपणे सहभागी झाले. प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका कोमल राऊत, वर्षा लोखंडे आणि अभिजीत दिलीप राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.
शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची भावना जागृत करणे हे शिक्षण संस्थेचे कर्तव्य आहे.” विद्यार्थ्यांनी दाखवलेली संवेदनशीलता आणि जबाबदारी निश्चितच प्रेरणादायी ठरली आहे.