धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील वाघोली येथील संतकृपा बहुउद्देशीय सामाजिक संस्था संचलित सदगुरू जोग महाराज गोशाळेतील पशुधनासाठी साठवलेला चारा अतिवृष्टीत वाहून गेला. त्यामुळे गोशाळेतील जनावरांवर उपासमारीची वेळ आली असल्याचे समजल्यानंतर येथील पशुधन वाचविण्यासाठी मदतीचे हात सरसावले आहेत. धाराशिवकरांनी या गोशाळेसाठी भरभरून मदत सुरू केली आहे.
अतिवृष्टीमध्ये सदगुरू जोग महाराज गोशाळेतील चारा वाहून गेला आहे. या गोशाळेत गायी-म्हशी मिळून सव्वादोनशे पशुधन आहे. या मुक्या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर गोशाळेमार्फत मदतीचे आवाहन करण्यात आले होते. त्यानंतर तमाम धाराशिवकरांनी या गोशाळेसाठी मदतीचा हात पुढे केला. धाराशिव शहरातील गवळी गल्ली येथील बाल हनुमान गणेश मंडळ, समता मध्यवर्ती गणेश मंडळ, सागर मोरे फॅन क्लब, सनी पवार, गौरीनंदन गोशाळा यांच्यामार्फत सदगुरू जोग महाराज गोशाळेतील पशुधनासाठी आर्थिक मदत सुपुर्द केली.
गौरीनंदन गोशाळेचे अध्यक्ष गिरीश सुरेश करपे यांनी स्वतःच्या वाढदिवसावरील खर्च टाळून पशुधनाच्या चाऱ्यासाठी रक्कम दिली. वाढदिवस साजरा करण्यापेक्षा मुक्या जनावरांना केलेल्या मदतीमुळे समाधान वाटत असल्याची भावना व्यक्त करत त्यांनी इतर नागरिकांनी देखील मदतीसाठी पुढे यावे असे आवाहन केले. यावेळी हभप भारत महाराज कोकाटे, गोशाळेचे संचालक आकाश महाराज मगर, प्रा.भालचंद्र हुच्चे, गजानन खेलगवळी, काशीनाथ दिवटे, संजय पाळणे, सोमेश्वर पाळणे, युवराज हुच्चे, नंदकुमार हुच्चे, धनंजय राऊत, हभप डॉ.ईश्वर कुंभार, सुजित साळुंके, भैय्या माळी, राहुल मगर, अमित बांगड, गौरीनंदन गोशाळेचे अध्यक्ष गिरीश करपे, उपाध्यक्ष मनोज अंजिरखाने, सचिव आनंद वाघमारे, यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.