धाराशिव (प्रतिनिधी)-जिल्ह्यात एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. मंगळवारपासून सुरू झालेल्या आंदोलनात जिल्ह्यातील 6 ही एसटी डेपोमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
एसटी महामंडळाचे चालक, वाहक, कार्यशाळा, प्रशासकीय मिळून 2 हजार 473 अधिकारी, कर्मचारी आहेत. राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्याच्या मागणीसाठी व इतर काही मागण्यांसाठी कर्मचारी संघटनेने हे आंदोलन चालू केले आहे. जिल्ह्यात एकूण 400 बसेस असून, रोज 2 हजार 500 फेऱ्या होत असतात. व यामधून धाराशिव विभागाला दररोज 45 ते 50 लाख रूपयांचे उत्पन्न मिळत असते. या आंदोलनामुळे कळंब एसटी डेपो 66 फेऱ्या, उमरगा 2 फेऱ्या, धाराशिव 17 फेऱ्या, भूम 4 फेऱ्या, तुळजापूर 2 फेऱ्या आणि परंडा 12 फेऱ्या झाल्या आहेत. सकाळच्या या फेऱ्यानंतर दिवसभर बस फेऱ्या 100 टक्के बंद होत्या. अचानक झालेल्या आंदोलनामुळे एसटी प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली.
190 बसेस गणपतीसाठी मुंबईला जाणार
धाराशिव जिल्ह्यातील एकूण किती बसेस गणपतीसाठी कोकण व मुंबईसाठी दिल्या आहेत. या संदर्भात धाराशिवचे एसटी विभाग नियंत्रक वी. सा. भालेराव या विचाराले असता त्यांनी 190 बसेस मुंबईला गणपतीसाठी पाठविण्यात येणार होते. परंतु कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे फक्त 20 बसेस मुंबईला पाठविल्या आहेत. उर्वरित बसेस कर्मचाऱ्यांचे आंदोलन संपल्यानंतर पाठवणार असल्याचे सांगितले.
भूममध्ये 320 कर्मचारी आंदोलनात
महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समिती एसटी कामगारांच्या प्रलंबित आर्थिक मागण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन दिनांक 3 सप्टेंबर रोजी भूम येथील आगारासमोर करण्यात आले. या बेमुदत धरणे आंदोलनात भूम एसटी आगारातील 320 अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला. यामुळे भूम तालुक्यातील दररोज जाणाऱ्या 131 फेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले.
यामध्ये एसटी कामगाराच्या प्रमुख मागण्या शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन आदा करावे, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता व वार्षिक वेतन वाढ आदी मागण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन चालू आहे. यावेळी तानाजी मोटे, मधुकर सानप, विशाल काळे, हंसराज कवडे, संतोष गरड, सुभाष ठणाबिर, वैभव हराळ आदी कर्मचारी संपात सहभागी झाले होते.