धाराशिव (प्रतिनिधी)- कारवाई न करण्यासाठी 15 हजाराची लाचेची मागणी केली. त्यापैकी 10 हजाराची लाच घेताना मंडलाधिकारी व महसूल सहायकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

नळदुर्ग मंडलाधिकारी जयंत श्रीपतराव गायकवाड (वय 47) व महसूल सहायक बाळासाहेब प्रकाश पवार (वय 45) या दोघांना अटक करण्यात आली आहे. मंडलाधिकारी जयंत गायकवाड व महसूल सहायक प्रकाश पवार यांना बुधवारी न्यायालयासमोर उभे करण्यात आले. दोन्ही आरोपींना 8 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तक्रारदार यांच्या मालकीच्या शेतीतील 20 गुंठे जमिनीचे खोदकाम करून किरकोळ रॉयल्टी भरून घेवून कोणतीही कारवाई न करण्यासाटी मंडलाधिकारी यांनी 15 हजार रूपये लाचेची मागणी केली. सापळा अधिकारी म्हणून पोलिस उपअधीक्षक सिध्दाराम म्हेत्रे यांनी काम केले. तर पथकात पोलिस अंमलदार दिनकर उगलमुगले, सचिन शेवाळे, नागेश शेरकर यांचा सहभाग होता. 

 
Top