धाराशिव (प्रतिनिधी)-  जिल्ह्यातील 57 पैकी 25 महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली आहे. ज्या मंडळात अतिवृष्टी नाही, तेथेे पंचनामे करण्यास तांत्रिक अडचणी होत्या. त्या दूर करून तेथील पीक नुकसानीचे पंचनामे करण्याबाबत तहसीलदार व तालुका कृषी अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. अतिवृष्टी नाही, मात्र नुकसान झाले आहे, अशा ठिकाणी शेतकऱ्यांनी तक्रार नोंदवून तातडीने पंचनामे करवून घ्यावेत. पंचनामे करून घेताना काही अडचणी आल्यास थेट आपल्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.

धाराशिव तालुक्यातील पाडोळी शिवारात तेरणा नदीच्या काठावर असलेल्या नुकसानीची आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी शनिवारी पाहणी केली. या परिसरात अतिवृष्टी झालेली नाही. तरी देखील तेरणा नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पाडोळी महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद नसल्यामुळे त्या ठिकाणी पंचनामे होत नव्हते. मात्र पूर परिस्थितीमुळे नदीकाठी असलेल्या शेतकऱ्यांचे झालेले नुकसान लक्षात घेता, या ठिकाणी तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी यांना प्रत्यक्ष सोबत घेवून पाहणी केल्यानंतर त्वरीत पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. पाडोळी प्रमाणेच जिल्ह्यातील अनेक ठिकाणी नदी-नाले आणि ओढ्यांच्या बाजूला असलेल्या शेतशिवारात पाणी साचल्याने शेती आणि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे, तेथेही पंचनामे करण्याच्या सूचना आपण दिल्या असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे. यावेळी आमदार पाटील यांच्या समवेत सुधाकर गुंड गुरुजी, तानाजी गायकवाड, नागप्पा पवार, युवराज ढोबळे, अजित पवार,  रावसाहेब गुंड, नीलकंठ पाटील यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.


 
Top