धाराशिव (प्रतिनिधी)-महाराष्ट्र सह देशाला विविध खेळातून सुवर्णपदक मिळवून देत राज्याची मान उंचावणाऱ्या खेळाडूंना ना कोणतीही परीक्षा, वा इंटरव्यू न देता राज्य शासनाने महाराष्ट्रातील विविध खेळाडूंना थेट नियुक्ती देत सरकारी नोकरी दिली आहे. त्यामध्ये धाराशिव जिल्ह्याला खो-खो ची पंढरी म्हणून ओळखले जाते. त्यातीलच एकूण दहा खो-खो खेळाडूंची महाराष्ट्र शासनाने थेट नियुक्ती द्वारे सरकारी नोकर भरती केली आहे. त्यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय खो-खो खेळाडू निकिता पवार व गौरी शिंदे यांची राजपत्रित अधिकारी वर्ग दोन पदी थेट नियुक्ती झाली आहे. तर राष्ट्रीय सुवर्णपदक विजेते ऋतुजा खरे, संपदा मोरे, मयुरी पवार, प्रीती काळे, जानव्ही पेठे, किरण शिंदे व निखिल मस्के यांचे वर्ग चार पदी थेट नियुक्ती झाली आहे.
या नियुक्ती बद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मनापासून आभार. तसेच महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे सचिव प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांनी घेतलेल्या विशेष परिश्रमामुळे अधिक अधिक खो-खो खेळाडूंना शासन सेवेत नोकरी लागण्यासाठी मदत झाली आहे.
वरील सर्व खेळाडू हे धाराशिव जिल्ह्यातील विविध ग्रामीण भागातील आहेत. जिथे कोणत्याही अत्याधुनिक सुविधा नसताना धाराशिव जिल्ह्याच्या खो-खो मैदानावर सराव करत वरील यश संपादन केले आहे. आजपर्यंत धाराशिव जिल्ह्याचे अनेक खो खो खेळाडू शासन सेवेत थेट नियुक्ती झाले आहेत. यामध्ये आता नियुक्त झालेल्या खेळाडूंसाठी भारतीय महासंघाचे सहसचिव व महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे सचिव प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांनी घेतलेल्या अविरत परिश्रमामुळे हे यश मिळाले आहे. असे धाराशिव जिल्हा खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष अनिल खोचरे व सचिव प्रवीण बागल यांनी सांगितले आहे.
खो-खो मैदानावर प्रवेश घेतल्यापासून त्या खेळाडूंचे खेळासोबत जीवन घडवण्यापर्यंतची अनमोल जबाबदारी आमचे पालक म्हणून कायम आमच्या पाठीशी असणारे आमचे मार्गदर्शक प्रा. डॉ चंद्रजीत जाधव यांना आमचे सर्व श्रेय जाते असे अंतराराष्ट्रीय सुवर्णपदक विजेती खेळाडू निकिता पवार व गौरी शिंदे यांनी सांगितले.