मुरुम (प्रतिनिधी)- शहरातील एका खाजगी शाळेत प्रभारी मुख्याध्यापकाने त्याच शाळेतील महिला शिक्षिकेला माझ्याशी मैत्री कर म्हणून सलग दोन महिन्यापासून छळ करुन विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शिक्षिकेच्या फिर्यादीवरून संबंधित मुख्याध्यापकावर मुरूम पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा शनिवारी (ता. 21) रोजी दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, मुरुम शहरातील डॉ. झाकीर हुसेन उर्दू प्राथमिक शाळेत प्रभारी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले नूर अहमद पीर अहमद कानकुर्ती यांनी आपल्या शाळेतील एका शिक्षिकेला तू माझ्याशी मैत्री कर नाहीतर तुझी पगार थांबवतो, तुला नोकरीवरून काढून टाकतो असे म्हणत सतत वाईट नजरेने बघत गेल्या दोन महिन्यांपासून छळ करत असल्याचे महिला शिक्षिकेने तक्रारीत नमूद केले आहे. शनिवारी (ता. 21) रोजी सदरील मुख्याध्यापकांनी शिक्षिकेचा नेहमीप्रमाणे छळ केल्याने याबाबत शिक्षिकेने आपल्या पतीला फोनवरून सांगून पोलीस ठाण्यात जाऊन सदर गुन्हा नोंद केला. शिक्षण क्षेत्रासारख्या पवित्र क्षेत्रात काळीमा फासणारी घटना घडली असून या घटनेमुळे शहरभरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक नवनाथ गाडेकर यांच्याकडे देण्यात आला आहे. आरोपी नराधम सद्या फरार असून पोलिस त्यांच्या शोध घेत आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

 
Top