धाराशिव (प्रतिनिधी)- माझी लढाई ही ओबीसी समाजासाठी आहे. जिल्ह्यात ओबीसी समाज मोठ्या संख्येने आहे. प्रस्तापित राजकर्त्यांनी जिल्ह्यातील विकासाचे प्रश्न सोडविले नाहीत. त्यामुळे तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून ओबीसी समाजाने जागृत राहून मतदान करावे. जरांगे पाटील यांच्यामुळे ओबीसी समाजात देखील राजकीय साक्षरता आली आहे. असे मत ओबीसी चळवळीच्या नेत्या डॉ. स्नेहा सोनकाटे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
रविवार दि. 22 सप्टेंबर रोजी धाराशिव येथील शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेस हरदास शिंदे, राजाभाऊ माळी, सरपंच नवनाथ मारकड, सुभाष मैंदाड, आप्पासाहेब पाटील, संदीपान मोटे, समर्थ पैलवान, चैतन बंडगर, वैभव लकडे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ. सोनकाटे यांनी राज्यात सध्या जी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. ती केवळ मुख्यमंत्री यांनी घेतलेल्या दुटप्पी भूमिकेमुळे झाली आहे. मुख्यमंत्र्यांचा हात कोणाच्या डोक्यावर आहे असा प्रश्न उपस्थित करून, मराठा समाजातील गोरगरीब लोकांसाठी आरक्षण महत्वाचे आहे. हे ओबीसी समाजाचे पण मत आहे. पण हे आरक्षण कायद्याला धरून देणे महत्वाचे आहे. तुळजापूर विधानसभा मतदारसंघात प्रस्तापित राजकर्त्यांनी बहुजनाचे दैवत अणदूरचा खंडोबा मंदिर यांचा का विकास केला नाही. अनेक गावात बसची सुविधा नाही. मराठा समाजातील प्रस्तापित राजकर्त्यांनी या मतदारसंघातील बहुजनांच्या विकासाकडे दुर्लक्ष केले आहे. या मतदारसंघातील विकासाचे प्रश्न सोडविले नाहीत. त्यामुळे तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे सांगत ही लढाई प्रस्तापिता विरूध्द विस्तापित असल्याचे डॉ. सोनकाटे यांनी सांगितले.