धाराशिव (प्रतिनिधी)-  जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील 25 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. बहुतांश शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक पाण्यात आहे, शेतातील माती वाहून जावून मोठे नुकसान झाले आहे. शासनाच्या माध्यमातून नुकसानी पोटी मदत मिळवून देण्यासाठी आपला पाठपुरावा राहील अशी ग्वाही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

भिकारसारोळा, म्होतरवाडी, गौडगांव, अंबेवाडी आदी गावच्या शेतशिवारात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सलग दोन दिवस पीक नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. आ.पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांच्या प्रत्येक प्रसंगात आपण सोबत आहोत. कसलीही अडचण असेल, तर आपल्याला कळवावी. पीक नुकसानीपोटी भरपाई मिळावी यासाठी पीकविमा कंपनी व शासनाकडे आपला पाठपुरावा राहील. जिल्हाधिकारी, कृषी अधिकारी व महसूल प्रशासनाला योग्य त्या सुचना दिलेल्या आहेत. नुकसानग्रस्तांना शासन स्तरावरून अर्थसहाय्य मिळावे यासाठी वेगाने पावले उचलली जात आहेत. विमा कंपनी, त्याचप्रमाणे राज्य व केंद्र सरकारच्या आपत्ती निवारण निकषाप्रमाणे नुकसान ग्रस्तांना लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.

यावेळी त्यांच्यासमवेत पंचायत समितीचे माजी सभापती नानासाहेब कदम, बालाजी गावडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नेताजी पाटील, माजी सभापती दत्तात्रय देवळकर, विजय हाऊळ, विशाल पाटील, अमोल पाटील, बालाजी पांचाळ, बिभीषण मुळे, बापू तनमोर, अशोक लाकाळ, सागर घाडगे, राम पांचाळ, परमेश्वर चव्हाण यांच्यासह भाजपाचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.

 
Top