धाराशिव (प्रतिनिधी)-आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव आयोजित गणपती उत्सवाअंतर्गत आज श्रीगणेशाची आरती करण्याचा मान अक्षरवेल साहित्य मंडळातील भगिनींना मिळाला. प्रेमाताई सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाने आणि भोसले ज्युनियर कॉलेजच्या वतीने संपन्न झालेल्या या सोहळ्यासाठी अक्षरवेल महिला साहित्य मंडळातील जवळजवळ पंचवीस महिलांच्या हातून आरती करण्यात आली.

अक्षरवेल मंडळाच्या मार्गदर्शिका जेष्ठ लेखिका कमलताई नलावडे, या संस्थेच्या अध्यक्षा डॉ. सुलभाताई देशमुख, संस्थापक अध्यक्षा डॉ. रेखाताई ढगे, उपाध्यक्षा प्रा.विद्या देशमुख यांच्यासह सर्व सदस्यांचा त्यांच्या लेखनसातत्याबद्धल यथोचित सन्मान करण्यात आला.

   आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचा सत्कार हा माहेरच्या सत्कारासारखा आहे म्हणून याचे मोल मोठे आहे. प्रेमा वहिनींच्या रूपाने बप्पांचा सेवाभावाचा वसा असाच पुढे चालू राहणार आहे असे आपल्या मनोगतात  विद्या देशमुख म्हणाल्या. तर धाराशिव जिल्हाला प्रेमाताईंच्या रुपाने एक आदर्श अशी सून लाभली आहे असे सत्काराला उत्तर देताना कमलताई नलावडे यांनी प्रतिपादन केले.

अक्षरवेल महिला साहित्य मंडळाकडून प्रेमाताई सुधीर पाटील आणि मंजुळा आदित्य पाटील यांचाही शैक्षणिक क्षेत्रातील मोलाच्या योगदानाबद्धल सत्कार करण्यात आला. कवयित्रींच्या कविता सादरीकरणाने कार्यक्रमाची सांगता झाली.

 
Top