धाराशिव (प्रतिनिधी)- हैद्राबाद मुक्ती संग्राम  लढ्यामध्ये सर्वसामान्यांसाठी आयुष्यभर लढणारे भाई उद्धवराव पाटील व भाई नरसिंगराव देशमुख यांचे योगदान महत्त्वाचे आहे. मुक्ती संग्राम दिन साजरा का करायचा ? त्या मागची भूमिका विद्यार्थ्यांनी जाणून घेतली पाहिजे. हैद्राबाद मुक्ती संग्राम लढ्यासाठी ज्यांनी योगदान दिले त्यांच्या विचारांचा वारसा व प्रेरणा विद्यार्थ्यांनी घ्यावी असे प्रा. रवी सुरवसे यांनी बोलताना सांगितले.

हैद्राबाद मुक्तिसंग्राम दिनाचा 76 वा वर्धापन दिन छत्रपती शिवाजी हायस्कूल व आदर्श प्राथमिक विद्यामंदिर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रा. रवी सुरवसे बोलत होते.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षा राजर्षी शाहू शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती शशिकलाताई घोगरे या होत्या. प्रसंगी कार्याध्यक्ष एम.डी. देशमुख, सचिव भाई धनंजय पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य शामराव घोगरे, प्राचार्य पी. एन. पाटील, मुख्याध्यापक के. बी. घोडके, उपप्राचार्य एस. पी. मुंडे, पर्यवेक्षक अमोल दिक्षीत, पर्यवेक्षक व्ही.के. देशमुख आदी व्यासपीठावर उपस्थित होते. देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आज व्यक्तीला ' स्वांतत्र 'आहे म्हणजे त्याला आचार, विचार, वाचन, लेखन, अशा सर्वच बाबतीत त्यास स्वातंत्र्य आहे. पण दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर गदा न आणता समाजाची उभारणी झाली पाहिजे. यासाठी विद्यार्थ्यांनी राष्ट्र निर्माणाचे कार्य करावे असे आवाहन एम.डी. देशमुख यांनी बोलताना केले.

विद्यार्थ्यानी स्वातंत्र्य लढ्यातील योध्याचे स्मरण करावे. अभ्यासातून आत्मविश्वास निर्माण करून स्वावलंबी बनावे असे अध्यक्षिय भाषणात श्रीमती शशिकलाताई घोगरे यांनी सांगितले. प्रशालेची प्राचार्य पी. एन. पाटील यांच्या हस्ते ध्वज पूजन व ध्वजारोहण करण्यात आले. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल, भाई उद्धवराव पाटील, भाई नरसिंहराव देशमुख यांना प्रसंगी पुष्पांजली वाहण्यात आली.

प्रशालेतील जिल्हास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेतील विजेते 14 वर्षाखालील मुले व मुलींचा संघ, 19 वर्षाखालील मुलींचा संघ, वुशू, बॉक्सिंग, किक बॉक्सिंग, महावाचन अभियानमधील गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. प्रास्ताविक प्राचार्य पी. एन. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन करून आभार आण्णासाहेब कुरुलकर यांनी मानले. कार्यक्रमास प्रशालेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.

 
Top