धाराशिव (प्रतिनिधी)-महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सवाच्या काळात गणपतींच्या पाठोपाठ गौराईचं आगमन होतं. उद्या 10 सप्टेंबर रोजी गौरी आवाहन घराघरामध्ये मध्ये करण्यात येत आहे.
आपल्या हिंदु धर्मात सण-उत्सवाचे आगळे-वेगळे महत्व आहे. प्रत्येक सणाला एक परंपरा आणि संस्कृती लाभलेली आहे. मराठी 12 महिन्यातील प्रत्येक महिन्याचे महत्व आहे. प्रत्येक महिन्यात काही सण-उत्सव, परंपरा किंवा पूजा-विधी केली जाते, ज्यामुळे घरात आपल्या कुटूंबात सुख-समृद्धी लाभते, सकारात्मकता वाढते. श्रावण महिन्याच्या पाठोपाठ येणारा भाद्रपद महिनाही असाच खास असतो. कारण विशेष म्हणजे या महिन्यात गौरी गणपती आपल्या घरी येतात .आता ज्येष्ठा गौरींची स्थापना करण्यात येईल. याला गौरी गणपती किंवा महालक्ष्मी पूजन देखील म्हंटले जाते.
यंदा गौराई 10 सप्टेंबर रोजी गौरी आवाहन आहे, 11 सप्टेंबर रोजी गौरी पूजन होईल तर 12 सप्टेंबर रोजी गौरी विसर्जन करण्यात येईल. काही घरात ज्येष्ठा आणि कनिष्ठा अशा दोन गौराई येतात. एक दिवसाचा पाहुणचार स्वीकारून गौराईचं तीसऱ्या दिवशी विसर्जन करण्यात येते. आकर्षक सजावट करून गौराईचे स्वागत करण्यात येते.
गौरी म्हणजे पार्वती. शिव शंकराची पत्नी माहेरपणाला येते आणि आशिर्वाद देऊन जाते अशी या सणामागील धारणा आहे. गौरी आवाहनानंतर दुसरा दिवस गौरी पूजनाचा असतो. त्यादिवशी रात्रभर साऱ्या माहेरवाशिणी खेळ खेळून सण साजरा करतात आणि तीसऱ्या दिवशी पुढच्या वर्षी पुन्हा या असे सांगून क्षमा प्रार्थना करून गौरीचे विसर्जन करतात.