धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव,बीड जिल्ह्यात बाल विवाह, हुंडाप्रथा आणि स्त्रीभ्रूणहत्या सारख्या अनिष्ठ प्रथा निर्मूलनाकरिता केलेल्या यशस्वी कार्याबद्दल धाराशिव व बीड जिल्ह्याच्या तत्कालीन जिल्हाधिकारी तथा विद्यमान पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती दीपा मुधोळ मुंडे यांना “स्कॉच“ राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला असून या पुरस्काराचे वितरण 21 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे होणार आहे.

मराठवाड्यात छुप्या पद्धतीने होणारे बालविवाह रोखण्यात व त्याविषयी जनजागृती करण्यात तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीमती मुंडे यांचा मोठा वाटा असून त्यांनी अनेक बालविवाह रोखण्यात यश मिळविले होते. त्या कार्यात त्यांना तत्कालीन जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांचीही मोलाची साथ लाभली होती. त्यांनी केवळ बालविवाह रोखले नसून त्या मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणल्याने त्या मुली आज उच्चशिक्षित बनल्या आहेत.आर्थिक दुर्बल घटकातील मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणल्याने अनेक मुलींचे आयुष्य घडले. त्या कार्याची दाखल घेत श्रीमती मुधोळ-मुंडे यांचा या पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे.    

श्रीमती मुधोळ- मुंडे यांनी सामान्य कुटुंब, वाडी, वस्ती, तांडे यावर स्वतः जात बालविवाह रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. शिवाय बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांना मार्गदर्शन करीत जिल्ह्यात टास्क फोर्स ची निर्मिती करून “बालविवाह- एक अभि:शाप“ या लघुपटाची निर्मिती करून समाजात जनजागृती घडवून आणली. अशा नानाविध जनजागृती उपक्रम राबविले त्याचे फलित म्हणून अनेक अल्पवयीन मुलींचे विवाह रोखले व त्याच्या आयुष्यात हसू आले. अनेक मुलींच्या आयुष्यात त्यांनी बदल घडविला त्याची दखल यानिमित्ताने घेतली गेली आहे.

आजही बालविवाह हा शब्द जरी कानावर पडला तर तत्कालीन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांचे नाव धाराशिव जिल्ह्यातील प्रत्येक वाड्यावस्त्यातील सर्वसामान्य नागरिकांत आदराने चर्चिले जाते.

 
Top