धाराशिव (प्रतिनिधी)-  नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहिला तर जबाबदारी प्रशासनाची असेल असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी दिला आहे.

धाराशिव-कळंब मतदार संघातील कळंब तालुक्यात मुख्य पिक असलेल्या सोयाबीनची 74,611 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्याचबरोबर ज्वारी, बाजरी, कापुस, तुर, मुग, उडीद, सुर्यफुल ही पिके धरुन 80,328 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे.  तसेच धाराशिव तालुक्यात सोयाबीनची 1,05,716 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे.  तसेच त्याचबरोबर ज्वारी, बाजरी, कापुस, तुर, मुग, उडीद, सुर्यफुल ही पिके धरुन 1,13,177 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. धाराशिव जिल्हयामध्ये मागील काही दिवसापासुन अतिवृष्टी व सततचा पाऊस झाल्यामुळे पेरणी झालेल्या क्षेत्रावरील सर्वच पिके बाधीत झाली आहेत.  

कळंब तालुक्यात अतिवृष्टी झाल्यामुळे सर्व महसुल मंडळातील पेरणी झालेल्या क्षेत्रावरील 100 टक्के  पिके बाधीत झालेली असतानाही नुकसानीच्या प्राथमिक अहवालात नुकसान बाधीत क्षेत्र कमी दर्शविल्याचे निदर्शनास आले आहे.  तसेच धाराशिव तालुक्यातील काही महसुल मंडळात अतिवृष्टी व काही महसुल मंडळात सततचा पाऊस झाला असल्याने पेरणी झालेल्या क्षेत्रावरील 100 टक्के पिके बाधीत झालेली असतानाही  नुकसानीच्या प्राथमिक अहवालात नुकसान बाधीत क्षेत्र कमी दाखवले आहे. तरी अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन अहवाल शासनाला सादर करणेबाबत तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी आमदार पाटील यांनी केली आहे.


 
Top