भूम (प्रतिनिधी)- खंडेश्वर वाडी येथील प्रकल्प तातडीने दुरुस्त करा याबाबत दिनेश मांगले यांच्या नेतृत्वात परांडा तालुक्यातील शेतकरी बांधव यांनी काही दिवसापूर्वी उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय भूम यांना निवेदन दिले होते. सदरील निवेदनात प्रकल्पाच्या कामास सुरुवात न केल्यास रास्ता रोको करून जन आक्रोश आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता. याची कसलीही दखल संबंधित विभाग यांच्या वतीने घेण्यात आली नसल्याने शहरातील गोलाई चौकात दिनेश मांगले यांच्या नेतृत्वात परांडा तालुक्यातील खंडेश्वर वाडी यासह आसपासच्या गावातील शेतकऱ्यांनी विविध घोषणा देत रास्ता रोको करून आंदोलन केले.
मंत्र्यांनी सदरील काम जवळील गुतेदार यांना मिळावे याकरिता पाच वर्षात दोन वेळेस झालेले टेंडर पुन्हा बदलले. तरीही अद्याप कसलेही काम सुरू झाले नाही. यामुळे प्रत्येक वर्षी शेतीतून लाखो रुपये उत्पन्न जे शेतकऱ्यांना मिळत होते. ते मिळू शकले नाही. यावेळी माजी आमदार राहुल मोटे बोलत असताना म्हणाले की, 2020 साली हे खंडेश्वरवाडी मध्यम प्रकल्पाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. प्रकल्पावर सात ते आठ गावातील शेतकऱ्यांची जमीन ओलिताखाली येत होती. अभियंता यासह काही अधिकाऱ्यांनी जर लक्ष घातले असते तर हे धरण काही दिवसात पूर्ण झाले असते. परंतु विकासाच्या गप्पा मारणाऱ्या मंत्र्यांनी लक्ष न घातल्यामुळेच ही परस्थिती आली आहे.
यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख मेघराज पाटील,तानाजी जाधवर, दिलीप शाळू, प्रल्हाद आडागळे, विहंग कदम, भगवान बांगर, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाचे संजय पाटील, संजय बोराडे,भगवान पाटील, रमेश मस्कार, हनुमंत पाटुळे, गोरख भोरे, तानाजी पाटील उपस्थित होते. सदरील आंदोलनास महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सरपंच परिषद महाराष्ट्र राज्य व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे.