धाराशिव (प्रतिनिधी)-  विसर्जन मिरवणूक अथवा इतर मिरवणुकीमध्ये प्लाझमा, बीम लाईट, लेझर बीम लाईट, डीजे, डॉल्बी वापरण्यास जिल्हादंडाधिकारी धाराशिव यांनी मनाई केली आहे. त्यामुळे श्री गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मिरवणुकीत यांचा वापर करून नये. नसता सक्त कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिला. 

सोमवार दि. 16 सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेस अपर पोलिस अधीक्षक गौर हसन उपस्थिती होते. पुढे बोलताना पोलिस अधीक्षक जाधव यांनी 17 सप्टेंबर रोजी जिल्ह्यात एकूण 999 सार्वजनिक गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुका निघणार आहेत. तर 14 दिवसाच्या गणेश मंडळाचे विसर्जन 20 सप्टेंबर रोजी होणार आहे. गणेश उत्सव सर्वत्र जिल्ह्यात शांततेत पार पडला आहे. पोलिस विभागाच्यावतीने 421 शांतता बैठक घेतल्या आहेत. ईद ए-मिलाद जुलूस कमिटीने जुलूस मिरवणूक गणेश विसर्जन मिरवणूक झाल्यानंतर काढण्याचे ठरविले आहे. जिल्ह्यात या गणेश उत्सव व ईद-ए-मिलाद च्या अनुषंगाने 1586 गुंड, उपद्रवी, समाजकंटक लोकांवर विविध कायद्याप्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. प्लाझमा, बीम लाईट, लेझर बीम लाईट, डीजे, डॉल्बीचा वापर केल्यास लहान मुले, वयोवृध्द नागरिक यांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिस प्रशासन वापर न करण्याच्या सक्तीचा आदेश देत आहे. 


असा असेल बंदोबस्त 

पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी सांगितले की, गणेश विसर्जन मिरवणूक व ईद-ए-मिलाद अनुषंगाने धाराशिव जिल्ह्यात पोलिस व अतिरिक्त मनुष्यबळ तैणात करण्यात आले आहे. एक अपर पोलिस अधीक्षक, 5 डीवायएसपी, 20 पीआय, 49 एपीआय, 47 पीएसआय तर 1350 पोलिस कर्मचारी असणार आहेत. या सोबत दंगल नियंत्रक पथक दोन प्लाटून, जलद प्रतिसाद 2 पथक, एसआरपीएफ 1 प्लाटून या सोबतच 770 होमगार्ड मदतीला असणार आहेत. मिरवणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी 5 ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सीसीटीव्ही कॅमेर कार्यान्वित करण्यात आलेले आहे. सोशल मिडियावर कोणाही वादग्रस्त पोस्ट टाकू नये असेही आवाहन करण्यात आले आहे. 

 
Top