धाराशिव (प्रतिनिधी)- जोपर्यंत तडवळा गावातील नागरिकांच्या घरांची पर्यायी व्यवस्था होणार नाही, तोपर्यंत तुम्हाला राहत्या घरातून कोणीही हलवणार नाही, काळजी करू नका. पर्यायी घरांसाठी जिल्हा प्रशासन योग्य जागा शोधून देईल, तोपर्यंत तुम्हाला अडचणीत टाकून कुठलेही काम पुढे जाणार नाही अशा शब्दात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी तुळजापूर तालुक्यातील तडवळा येथील ग्रामस्थांना दिलासा  दिला.  

सोलापूर-तुळजापूर-धाराशिव या नव्याने होत असलेल्या रेल्वेमार्गात तुळजापूर तालुक्यातील तडवळा येथील दलीत वस्तीसह गावातील काही घरे बाधित होत आहेत. आमदार पाटील यांनी गावात जावून त्यांची भेट घेतली. त्यांच्या अडचणी तसेच म्हणणे आस्थेवाईकपणे जाणून घेत त्यांना दिलासा दिला.

जागेचा वाढीव मावेजा मिळवून द्यावा, राहण्याची पर्यायी व्यवस्था करण्यात यावी, अशी विनंती ग्रामस्थांनी आमदार पाटील यांच्याकडे केली. त्यावरून ग्रामस्थांना दिलासा देत विस्थापित कुटुंबांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याबाबत महसूल यंत्रणेला निर्देश दिले असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. हा रेल्वेमार्ग पूर्ण करत असताना तडवळा गावातील कोणत्याही नागरिकाचे नुकसान होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल. दलीत वस्तीमधील ज्या नागरिकांची घरे रेल्वेमार्गासाठी संपादीत केली जाणार आहेत, त्यांच्या राहण्याची पर्यायी व्यवस्था होत नाही, तोपर्यंत कोणाचेही घर हलविले जाणार नसल्याची ग्वाहीही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी यावेळी दिली.

शेतकरी आणि ग्रामस्थांच्या विनंतीवरून बाधित कुटुंबियांची भेट घेवून आमदार पाटील यांनी त्यांना दिलासा दिला. या नियोजित रेल्वेमार्गाच्या कामात गाव विस्थापित होणार, राहती घरे जाणार, या धास्तीने हवालदिल झालेल्या गावकर्यां ची आस्थेवाईकपणे विचारणा करून त्यांना मोठा विश्वास देत आमदार पाटील यांनी दिलासा दिला. यावेळी तुळजापूरचे युवा नेते विनोद गंगणे, माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, माजी नगरसेवक नानासाहेब लोंढे, सरपंच ज्ञानेश्वर पांडगळे, उपसरपंच प्रवीण चंदनशिवे यांच्यासह तडवळा येथील रेल्वेबाधित कुटुंबीय, शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.

 
Top