धाराशिव (प्रतिनिधी) - मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर महानगरीय शहरातील राजकीय व्यक्ती बसून ग्रामीण भागातील समस्या जाणून घेऊ शकत नाही. याची जाणीव काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री स्व यशवंतराव चव्हाण यांनी ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती निर्माण करण्याचे स्वप्न उराशी बाळगून ते वास्तवात उतरविले. त्यामुळे छोट्याशा गावातील व्यक्ती मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर बसू लागली. त्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील समस्या सुटल्याने ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास झाला व होत आहे. मात्र भारतीय जनता पार्टी हा पक्ष काँग्रेसने लावलेले ग्रामीण भागाच्या विकासाचे रोपटे तोडण्याचे काम करीत असल्याचा घणाघात केला. तसेच आमचे घर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोडले असून आम्हाला अस्वस्थ करून आमची बदनामी केली आहे. याचे दुःख आम्हाला असून तुम्हाला ते कधी ना कधी फेडावेच लागेल, अशा शब्दांत माजी राज्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकरराव चव्हाण यांनी भाजपवर जबरदस्त हल्लाबोल केला. 

विशेष म्हणजे मी 90 वर्षांचा तरुण पुन्हा विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी तयार असून म्हातारा बैलच चांगली पेरणी करू शकतो, खोंडावर पेरणी व्यवस्थित होत नसल्याचे सांगत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावरही दि.18 सप्टेंबर रोजी निशाणा साधला. धाराशिव तालुक्यातील येवती येथे काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते हनुमंत पवार, सुभाष हिंगमिरे, पंसचे माजी सभापती शिवाजी गायकवाड, रोहित पडवळ, लक्ष्मण सरडे, अशोक शिंदे, मुकुंद पाटील, सुरेश नाईकनवरे, गोविंद उंबरे, बळीराम उंबरे, भाऊ बारस्कर, अनिल वाकुरे, गोवर्धन भोसले, नंदकुमार क्षीरसागर आदी उपस्थित होते. पुढे बोलताना माजी मंत्री चव्हाण म्हणाले की, मी 22 व्या वर्षी राजकारणात आलो असून पूर्वी देखील हेवेदावे व गटबाजी होती. त्यावेळी विचारांची लढाई होती. मात्र आज घरात घुसून मारायचे प्रकार वाढले असूनही कुणाची संस्कृती आहे ? असा सवाल करीत त्यांनी थेट सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. मी 1985 साली उस्मानाबाद विधानसभेची निवडणूक काँग्रेसच्या तिकिटावर डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या विरोधात उभा राहिलो. आम्ही कधी गुंडगिरी केली नाही. मात्र गुंडगिरीच्या विरोधात आम्ही ताकद वापरली. मात्र 

त्यावेळी माझा अवघ्या 4 हजार मतांनी पराभव झाल्याचे त्यांनी नमूद केले. तुळजापूर तालुक्याची ओळख दगड व कुसळी तालुका म्हणून होती आज ठिकठिकाणी तलाव बांधून पाणी अडविल्यामुळे संपूर्ण तालुका हिरवागार झाला आहे. गोरगरिबांच्या विकास कामाला पडणे हे काम मी सत्तेत असताना केले व आता देखील त्यांच्या मदतीला धावून जात असल्याचे त्यांनी सांगितले. मागच्या निवडणुकीत तुम्ही मला मतदान केले. मात्र पराभव झाल्याने तुमच्या मताचा अवमान झाला आहे तो अवमान भरून काढण्यासाठी पुन्हा मला निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी प्रदेश प्रवक्ते हनुमंत पवार यांनी देखील भाजपच्या धोरणावर सडकून टीका केली. यावेळी लक्ष्मण सरडे यांच्यासह इतरांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार सुभाष हिंगमिरे यांनी मानले. यावेळी सुंभा, वाणेवाडी, हिंगळजवाडी, नितळी, येवती, टाकळी, इर्ला, दाऊतपूर, कोळेवाडी, रामवाडी, डकवाडी, राजुरी येथील माजी सरपंच विजय चव्हाण, उपसरपंच गोपाळ खांडेकर, जाफर शेख, उपसरपंच गोविंद उंबरे, सरपंच बाळासाहेब खांडेकर, बालाजी उबाळे, प्रकाश माळी, पोपट खांडेकर, सरपंच हमीद देशमुख, नबी शेख, फुलचंद कुचेकर, गोवर्धन भोसले, चेअरमन मोरे, रहीम मुलाणी, नंदकुमार क्षीरसागर, विष्णू चौरे, परमेश्वर नरटे, सोमनाथ खोत, रघुवीर राऊत, बाबा चौरे, हनुमंत हाजगुडे, लालासाहेब डक, बाळासाहेब मारवडकर, अकबर शेख, बाबा देडे यांच्यासह कोंड जिल्हा परिषद मतदार संघातील महिला, पुरुष व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top