धाराशिव (प्रतिनिधी)- नितळी ता. जि. धाराशिव येथील मूळ रहिवासी व जि. प. शिक्षण विभागातील शिक्षण विस्तार अधिकारी  मल्हार माने यांचे सुपुत्र असलेले प्रसाद याची इंग्लंड येथील दि युनिव्हर्सिटी ऑफ साऊथम्पटन येथे मानसशास्त्र विषयातील पीएचडी या संशोधन अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे. विशेष बाब म्हणजे त्यांना या शिक्षणासाठी मेफ्लॉवर ही प्रतिष्ठित फेलोशिप ही मिळाली आहे. 

या निमित्ताने प्रसाद माने यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्रातील एम. बी. ए. विभागाचे संचालक डॉ. सुयोग अमृतराव, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डाएटचे प्राचार्य डॉ. दयानंद जटनुरे, बील गेट्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. रिजवी, भारतातील नद्या जोड प्रकल्पावर डॉक्टरेट केलेले डॉ. एम. डी. पाटील, माजी शिक्षणाधिकारी जाधव, शिक्षण विस्ताराधिकारी जंगम व्यासपीठावर उपस्थित होते.

या देशातील तरुण हा जागतिक बुद्धीमतेच्या तुलनेत सरस आणि उजवा असल्याने जगात सर्वदूर भारतातील टॅलेंटेड विद्यार्थ्यांची अनेक शैक्षणिक व संशोधन क्षेत्रात ठळकपणे ओळख निर्माण होत आहे. प्रसादने आपल्याकडे ज्या काही रुढ, शैक्षणिक पदव्यांच्या मागे न लागता संशोधनाचा मार्ग निवडला तो वाखाणण्याजोगा आहे. या संधीचे सोने करुन आपल्या धाराशिवचे नाव निश्चिततपणे होईल असा विश्वास डॉ. अमृतराव यांनी व्यक्त केला. डॉ. जटनुरे, डॉ. पाटील, प्राचार्य रिजवी, माजी शिक्षणाधिकारी जाधव, शिक्षक बशीरभाई तांबोळी, भैय्या पाटील, शिवाजी साखरे यांची भाषणे झाली. यशस्वी पालक म्हणून श्री व सौ महानंदा मल्हार माने यांचाही सत्कार करण्यात आला. 

या कार्यक्रमास शहरातील प्रतिष्ठीत, नातेवाईक, मित्रपरिवार, शिक्षकवृंद मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विठ्ठल गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल सूर्यवंशी यांनी केले. तर आभार प्रदर्शन भालेकर यांनी केले.  

 
Top