धाराशिव (प्रतिनिधी) - गणरायाच्या आशीर्वादाने धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्गाच्या कामास आज प्रत्यक्ष सुरूवात झाली आहे. गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर उपळा शिवारात वाहने आणि यंत्राचे पूजन करून या कामास प्रारंभ करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यातील हे काम 30 महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित आहे, मात्र दोन वर्षांच्या आत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा प्रकल्प जाहीर केला होता. त्यामुळे महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीचे तीर्थक्षेत्र आता रेल्वेच्या नकाशावर येणार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.
शनिवारी धाराशिव तालुक्यातील उपळा (मा.) शिवारात रेल्वेमार्गाच्या कामास प्रत्यक्ष सुरूवात झाली. खऱ्या अर्थाने प्रकल्पाचे काम 2019 सालीच सुरू होणे अपेक्षित होते. मात्र उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना अडीच वर्षे राज्याचा हिस्सा न दिल्याने हे काम रखडले. राज्यात महायुतीचे सरकार येताच राज्याच्या हिश्श्याचा 50 टक्के निधी उपलब्ध करून देण्यात आला. त्यामुळे प्रत्यक्ष कामाला आता गती आली आहे. सुरूवातीला पाच वर्षात हे काम पूर्ण करण्याचे ठरविण्यात आले होते. मात्र आपण सातत्याने आग्रह धरल्यामुळे या कामाचे तीन टप्पे करून हे काम अडीच वर्षात पूर्ण करण्याचे उदिष्ट ठेवण्यात आले आहे. यातील पहिल्या टप्प्याचे काम सुरू झाले आहे. उर्वरित दोन टप्प्यांचे कामही लवकरच हाती घेण्यात येणार असल्याची माहिती आमदार पाटील यांनी दिली. कामाचा कालावधी जरी अडीच वर्षाचा असला तरी दोन वर्षांच्या आत पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले असल्याचे संबंधित अधिकारी आणि काम करणाऱ्या कंपनीने सांगितले आहे.
विधीवत पूजा करून प्रत्यक्षात कामाला प्रारंभ करण्यात आला. त्यामुळे आजचा दिवस धाराशिवकरांसाठी खूप महत्वाचा आहे. हे काम विनाविघ्न लवकरात लवकर पूर्ण होवो. अशी प्रार्थना गणरायाच्या चरणी करतो, अशा शब्दांत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या.