उमरगा (प्रतिनिधी)- महायुतीतील शिवसेना-भाजपध्ये उमरगा मतदारसंघात उमेदवारीवरून संघर्ष भडकण्याची शक्यता आहे. उमरगा-लोहारा या आरक्षित मतदारसंघाचे प्रतिनिधित्व विद्यमान आमदार ज्ञानराज चौगुले हे करत आहेत. महायुतीत विद्यमान आमदारालाच उमेदवारी देण्याचा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजपच्या इच्छुकांत अस्वस्थता दिसुन येत आहे. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष कैलास शिंदे यांनी पक्षाने उमेदवारी दिली नाही, तर अपक्ष लढण्याची तयारी दाखवत बंडाचे निशाण फडकावले आहे.
अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या उमरगा - लोहारा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आमदार ज्ञानराज चौगुले यांनी सलग तीनवेळा विजय मिळवल्याने ही जागा पुन्हा शिवसेनेच्या वाट्याला जाणार असे दिसून येत आहे. युतीमुळे भाजपाला संधी मिळत नाही आणि सत्तेत वाटाही दिला जात नसल्याचे भाजपा कार्यकर्ते नाराज दिसत आहेत. यातच भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष कैलास शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन, प्रकृती अस्वस्थतेमुळे भाजपाकडे निवडणूक लढविण्याची तयारी आपण दाखविली नव्हती. मात्र गेल्या दोन महिन्यापासून मतदार संघातील लोकांनी माझ्या प्रेमापोटी व आग्रहाने मला निवडणूक लढविण्यास विनंती केल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे. भाजपाने उमेदवारी टाळल्यास ऐनवेळी अपक्ष उमेदवार म्हणून लढण्याची आपली तयारी असल्याचे स्पष्ट करत शिंदे यांनी कोणत्याही परिस्थितीत विधानसभा निवडणुक आखाड्यात उतरणार असल्याचे सांगितले. कैलास शिंदे यांच्या दावेदारीमुळे आता या मतदारसंघात पेच निर्माण होणार आहे. भविष्यात काहीही घडू शकते, मात्र मी निवडणूक लढविणार अन् निवडूनही येणार, असा दावा शिंदे यांनी केला आहे. पहिल्यांदा पक्षाकडे विधानसभा निवडणुक लढवण्यास नकार दिलेले भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष कैलास शिंदे यांनी सर्व जाती, धर्मातील लोकांच्या रेट्यामुळे आपण निवडणूकीच्या तयारीला लागल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान 2014 मध्ये युतीमध्ये फूट पडल्यानंतर कैलास शिंदे यांनी भाजपकडून निवडणूक लढविली होती. तेव्हा त्यांना 30 हजार 521 मते मिळाली होती.