धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव, तुळजापूर, कळंब, ढोकी, तेर तसेच परिसरात आज बुधवारी सकाळी ठीक 8 वाजून 3 मिनिटांनी भूगर्भातून सलग तीन वेळा प्रचंड मोठा आवाज आल्याची घटना घडली. या अचानक झालेल्या आवाजामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेकांनी घाबरून घराबाहेर धाव घेतली. काही नागरिकांनी हा भूकंप असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळच्या सुमारास अचानक मोठा स्फोटासारखा आवाज झाला आणि त्यानंतर काही क्षण जमीन हलल्याचा व कंपन जाणवल्याचा अनुभव काही नागरिकांनी सांगितला. हा आवाज नेहमीपेक्षा अधिक तीव्र आणि वेगळा असल्याचेही अनेकांनी नमूद केले. त्यामुळे परिसरात काही काळ संभ्रम आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. विशेष म्हणजे, यापूर्वीही सुमारे पंधरा दिवसांपूर्वी धाराशिव जिल्ह्यात अशाच प्रकारचा भूगर्भातून मोठा आवाज झाल्याची घटना घडली होती.
त्या वेळीही समाज माध्यमांवर भूकंप झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र प्रशासनाकडून अधिकृतपणे भूकंपाची कोणतीही नोंद झालेली नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते. धाराशिव जिल्ह्यात अधूनमधून भूगर्भातून गूढ आवाज येण्याच्या घटना घडत असल्याचे अनुभव येतात. प्रत्येक वेळी प्रशासनाकडून भूकंप नसल्याचे सांगण्यात येते. मात्र आज सकाळी झालेला आवाज अधिक तीव्र असल्यामुळे नागरिकांमध्ये पुन्हा भूकंपाच्या चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, या घटनेबाबत प्रशासनाकडून माहिती घेण्याचे प्रयत्न सुरू असून संबंधित यंत्रणांकडून पडताळणी केली जात आहे. अधिकृत अहवाल आल्यानंतरच या घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता व संयम राखावा, असे आवाहन प्रशासनाकडून केले आहे.