भूम(प्रतिनिधी)- प्राईड इंग्लिश स्कूल भूमच्या वतीने आयोजित करण्यात आलेला “नृत्य रंग” वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. कार्यक्रमात भारतीय संस्कृती, परंपरा आणि कलेचा भव्य अविष्कार बाल कलाकारांनी आपल्या प्रभावी सादरीकरणातून घडवून आणला.
तत्पूर्वी कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रताप भैय्या देशमुख व तालुका कृषी अधिकारी अतुल ढवळे यांच्या हस्ते व विलास शाळू,ऍड.सिराज मोगल अमर सुपेकर व फैजान काझी यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून करण्यात आले.
यावेळी काश्मिरी, पंजाबी, असामी, दक्षिण भारतीय तसेच गोवा आणि गुजरात येथील पारंपरिक नृत्यप्रकार सादर करण्यात आले. प्रत्येक राज्याची वैशिष्ट्यपूर्ण वेशभूषा, संगीत आणि नृत्यशैली यांमुळे संपूर्ण भारताची सांस्कृतिक विविधता एका मंचावर अनुभवायला मिळाली. तालबद्ध सादरीकरण आणि आत्मविश्वासपूर्ण अभिनयामुळे सभागृह टाळ्यांच्या गजरात दुमदुमून गेले.
लहानग्या विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांची अप्रतिम छाप पाडली. पालक व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेला हा सोहळा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा सुंदर उत्सव ठरला. “नृत्य रंग” या कार्यक्रमाने ‘विविधतेत एकता’ हा भारताचा संदेश प्रभावीपणे सादर करत उपस्थितांच्या मनात ठसा उमटवला. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन अलीम शेख यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षिका मेघा सुपेकर, दीपिका टकले, मोनिका बोराडे यांच्यासह सेविका आशा म्हेत्रे, अरुणा बोत्रे यांनी परिश्रम घेतले.