धाराशिव (प्रतिनिधी)- दि. 18 फेब्रुवारी 2026 तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथील बी.कॉम वर्गाच्या विद्यार्थ्यांनी रूपामाता ऍग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड, पाडोळी (आ) येथे औद्योगिक भेट दिली.
या भेटीचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष कामकाजाची माहिती देणे हा होता. रूपामाता ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड या अंतर्गत दूधजन्य पदार्थ निर्मिती आणि गुळ निर्मिती कारखाना या दोन उद्योगांना प्रत्यक्ष भेट देण्यात आली. रूपामाता ॲग्रोटेक येथील अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना उत्पादन प्रक्रिया, आधुनिक यंत्रसामग्री, गुणवत्ता तपासणी पद्धती तसेच पॅकिंग विभागाची सविस्तर माहिती दिली. दूध प्रक्रिया व उत्पादने या संबंधित उत्पादनांची निर्मिती कशी केली जाते याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी उद्योगातील सुरक्षितता नियम, व्यवस्थापन पद्धती आणि विपणन प्रक्रिया यांची माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन केले. या भेटीमुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानासोबतच प्रत्यक्ष अनुभव मिळाला.
तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथील वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.डॉ.नेताजी काळे, प्रा. डॉ. दत्तात्रय साळुंके, प्रा. निलेश एकदंते, प्रा.सुदर्शन गुरव, प्रा.शिवकन्या निपाणीकर इत्यादी प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली ही भेट यशस्वीरीत्या पार पडली. विद्यार्थ्यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत भविष्यातही अशा शैक्षणिक भेटी आयोजित करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
