धाराशिव (प्रतिनिधी)- केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार या नेत्यांनी प्रयत्न करून सोयाबीन, कांदा, पामतेल याबाबत मार्ग काढला आहे. सोयाबीनला 5 हजारापेक्षा जास्त भाव मिळेल. त्यासाठी पुढील आठवड्यात सोयाबीन आधारभूत केंद्र सुरू होणार आहे. अशी माहिती भाजपाचे माजी मंत्री तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी रविवार दि. 15 सप्टेंबर रोजी पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेस भाजपाचे नितीन काळे, रामदास कोळगे, अभय इंगळे, सतीश दंडनाईक, राजसिंह राजेनिंबाळकर, साहेबराव घुगे आदी उपस्थित होते. अधिक माहिती देताना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सरकारने शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळाला पाहिजे हा विषय गांभिर्याने घेतला आहे. कांदा निर्यात धोरणामध्ये बदल करण्यात आला आहे. तर पामतेल आयात धोरणामध्ये कर वाढविण्यात आले आहेत. त्यामुळे शेतमाला योग्य भाव मिळेल. अतिवृष्टीचे अनुदान, पीकविमा याबाबत लवकरच शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले जातील. शेतकऱ्यांची बाजू मांडण्यासाठी उच्च न्यायालयात जेष्ठ विधिज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे असेही आमदार पाटील यांनी सांगितले आहे.