नळदुर्ग (प्रतिनिधी)- तुळजापुर - नंदगाव या बसचा ब्रेक निकामी होऊन झालेल्या अपघातामध्ये 30 प्रवाशी जखमी झाले आहेत. हा अपघात दि. 23 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास मुर्टा पाटीजवळ झाला आहे. दैव बलवत्तर म्हणुन यामध्ये जीवितहानी झाली नाही. विशेष म्हणजे ब्रेक फेल होणे, स्टेरींग रॉड तुटणे, पाटा तुटणे अशा घटना गेल्या दोन महिन्यात जिल्ह्यात चार ते पाच वेळेस घडल्यामुळे प्रवाशी वर्गात भितीचे वातावरण पसरले आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, दि. 23 सप्टेंबर रोजी तुळजापुरहुन नंदगावकडे जाणारी बस क्र. एम. एच. 20 बी एल 4235 ही किलज मार्गे नंदगावाकडे जात असताना सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास मुर्टा पाटीजवळ बसचा ब्रेक निकामी झाल्यामुळे अपघातग्रस्त झाली. ब्रेक निकामी झाल्यामुळे बस रस्त्याच्या कडेला असलेल्या मातीच्या ढीगऱ्यावर गेली. सध्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु असुन या कामासाठी खोदकाम केलेला हा मातीचा ढिगारा होता. हा ढिगारा होता म्हणुन भीषण अपघात होता, होता वाचला, या मातीच्या ढिगाऱ्यामुळे बस थांबली. अन्यथा बस खाली लांब जाऊन पलटी झाली असती. या अपघातामध्ये जवळपास 30 प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमीमध्ये सर्वाधिक प्रवाशी हे मुर्टा आणि चिकुंद्रा येथील आहेत. या सर्व जखमींवर नळदुर्ग येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.