नळदुर्ग (प्रतिनिधी) - राज्य सरकारने धनगर एसटी आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करावी अन्यथा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत धनगर समाज सरकारला खाली खेचल्याशिवाय शांत बसणार नाही असे धनगर समाजाचे नेते गणेश सोनटक्के यांनी इटकळ येथील रास्ता रोको आंदोलन प्रसंगी म्हटले आहे. धनगर एसटी आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करावी या मागणीसाठी सोमवार दि. 23 सप्टेंबर रोजी इटकळ ता. तुळजापुर येथे राष्ट्रीय महामार्गावर धनगर समाज बांधवांच्या वतीने भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी महामार्गाच्या दोन्ही बाजुला वाहनांच्या लांबच, लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी बोलतांना गणेश सोनटक्के यांनी म्हटले की, पहिले समाज मग आपला पक्ष समाजाचा विषय आल्यानंतर आपण समाजासोबत राहिले पाहिजे ही भुमिका सर्वांनी घेतली पाहिजे. आजपर्यँत सर्वच राजकीय पक्षानी धनगर समाजाला मातीत घालण्याचे काम केले आहे. संविधानाने दिलेल्या आरक्षणापासुन आपल्याला वंचित ठेवण्याचे काम या राजकीय पक्षांनी केले आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जो आपल्या एसटी आरक्षणाच्या बाजुने आहे त्यालाच धनगर समाज बांधवानी मतदान करावे असेही गणेश सोनटक्के यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडी काय किंवा महायुती काय सगळे एका माळेचे मणीच त्यामुळे धनगर समाज बांधवांनी कुणावरही विश्वास न ठेवता जो आपल्या आरक्षणाची बाजु विधानसभेत मांडतो त्याच्या पाठीशी राहावे. आता येणाऱ्या काळात विधानसभा निवडणुक होणार आहे या निवडणुकीत अनेक राजकीय पक्षांचे उमेदवार आपल्याकडे मताची भीक मागण्यासाठी येतील त्यावेळेस त्यांना धनगर समाजाच्या एसटी आरक्षण अंमलबजावणीबाबत आपली भुमिका काय हे ठणकावुन विचारावे असेही गणेश सोनटक्के यांनी म्हटले आहे. राम जवान, चेतन बंडगर, डॉ.स्नेहा सोनकाटे, बाळकृष्ण घोडके, महेश खांडेकर, आप्पासाहेब पाटील, संजय घोडके, अरविंद पाटील, ज्ञानेश्वर माशाळकर, रामराजे पाटील यांनी ही मनोगत व्यक्त केले. या रास्ता रोको आंदोलनात तुळजापूर तालुक्यातील बहुसंख्य धनगर समाज बांधव उपस्थित होते. लहुजी शक्ती सेनेनेही यावेळी धनगर आरक्षनास पाठींबा दिला.

 
Top