धाराशिव (प्रतिनिधी) - शहरातील बाळासाहेब ठाकरे नगर येथे ठाकरे नगर नवरात्र महोत्सव 2024 चे आयोजन दि.3 ते 12 ऑक्टोबर दरम्यान आयोजन करण्यात आली आहे. या महोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. देवी आणून बसविण्यापासून ते मिरवणुकीपर्यंतच्या सर्व कार्यक्रमांचे आयोजन व नियोजनची जबाबदारी महिलांकडे सोपविण्यात आली असून खऱ्या अर्थाने महिला शक्तीचा सन्मान केला आहे. दि.3 ऑक्टोबर रोजी येडेश्वरी मंदिरातून देवीची पायी ज्योत आणण्यात येणार असून साडेतीन शक्तीपीठातील आदिशक्ती आदिमाया देवींच्या पायांचे कुंकूरुपी आशीर्वाद कुंकू व वाण आणण्यात येणार आहे. ते देखील घरोघरी स्थापन करण्यात येणाऱ्या घटांसाठी वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाचा लाभ देवीभक्तांसह सर्व नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन ठाकरे नगर नवरात्र महोत्सव मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रमुख प्रशांत साळुंके यांनी केले आहे.
धाराशिव शहरातील बाळासाहेब ठाकरे नगर येथे गेल्या 22 वर्षांपासून नवरात्र महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असून यंदा हे 23 वे वर्ष आहे. या नवरात्र महोत्सवास विविध कार्यक्रम राबविले जात असल्यामुळे सर्व समाजातील नागरिक यामध्ये स्वतःहून सहभाग नोंदवीत आहेत. या नवरात्र महोत्सवाच्या आधारस्तंभ शामल साळुंके तर अध्यक्षा म्हणून सुरेखाताई खांडेकर व उपाध्यक्षा सत्यशीला गायकवाड व सचिव प्रतिभा गाडे तसेच मिरवणूक प्रमुख लता इंगळे, श्रद्धा उगलमोगले यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर रांगोळी प्रमुख शिवानी कोळी व योगिता निलंगे तसेच आरतीचे नियोजन कोमल कदम व वर्षा डोके यांच्याकडे तर भोगी प्रमुख म्हणून मीनाक्षी महामुनी व मंगल सलगर तर स्पर्धाप्रमुख म्हणून निकिता सिरसट व दिपाली चौधरी तसेच देवी आणण्याचे नियोजन रेखा शिंदे व दिपाली गायकवाड यांच्याकडे तर महाप्रसादाचे नियोजन रुक्मिणी सुर्यवंशी, सुरेखा पवार, अनारकली शिंदे व सत्यभामा खोत तसेच होम विधीचे नियोजन शितल कसपटे व इंदू जगताप यांच्याकडे तसेच दांडिया प्रमुख म्हणून लता राठोड, शुभांगी काळे व राणीताई काळे यांच्याकडे तर आराधी गीत प्रमुख म्हणून अनिताताई शेंडगे व विमल साठे तर कुंकू मार्चनचे नियोजन योजनाबाई सलगर, अर्चना सोनटक्के व पूजा वाघमारे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. तसेच लहान मुलांसाठी रंगसंगती स्पर्धा व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांचे सर्व नियोजन महिला शक्ती असलेल्या महिलांकडे देऊन खऱ्या अर्थाने महिला सशक्तिकरण करण्याचे काम या उत्सव मंडळाच्या माध्यमातून सातत्याने केले जात आहे.
देवी मंडपात आराध्यांची गाणी होणार सादर
घटस्थापनेपासून दररोज देवी मंडपामध्ये सायंकाळी देवींची आराधी गाणी सादर केली जाणार आहेत. दांडिया, चित्रकला प्रशिक्षण, रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. तर आराधी गाण्यांमध्ये गुरुवार दि.3 ऑक्टोबर रोजी आराधी गाणी, शुक्रवार दि.4 ऑक्टोबर रोजी पोपट खिल्लारे, शनिवार दि.5 ऑक्टोबर रोजी चांदनाबाई कांबळे, रविवार दि.6 ऑक्टोबर रोजी दादा माळी (अंबेजवळगे), सोमवार दि.7 ऑक्टोबर रोजी किशोर धुत (बीड), मंगळवार दि.8 ऑक्टोबर रोजी सांजा येथील आराधी मंडळ, बुधवार दि.9 ऑक्टोबर रोजी बोंदर (उत्तमी कायापुर), गुरुवार दि.10ऑक्टोबर रोजी साखरबाई टेकाळे व विष्णू देडे तर शुक्रवार दि.11 ऑक्टोबर रोजी वैराग येथील आराधी मंडळ तसेच शनिवार दि.12 ऑक्टोबर रोजी होम विधी दसरा कार्यक्रमाने उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.