धाराशिव (प्रतिनिधी) -  संत रोहिदास चर्मोद्योग  व चर्मकार विकास महामंडळाचे थकीत कर्ज माफ करण्यात यावे, संत रविदास महाराज यांच्या नावे विद्यापीठ सुरू करण्यासाठी 100 एकर जमीन व निधी त्वरित देण्यात यावा यांसह इतर विविध प्रलंबित मागण्यांसाठी मुंबई येथील आझाद मैदानावर दि.1 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा प्रचंड मोर्चा धडकणार असल्याची माहिती राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष नितीन शेरखाने यांनी दिली. 

पुढे बोलताना शेरखाने म्हणाले की, राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्यावतीने शासनाकडे वारंवार समाज हिताच्या मागण्या करण्यात आल्या. मात्र त्या मागण्यांची पूर्तता न केल्यामुळे त्या तशाच प्रलंबित आहेत. यामध्ये संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक सुट्टी देण्यात यावी तर संत रविदास कौशल्य विकास बार्टी प्रमाणे सुरू करून बार्टीच्या धरतीवर स्वतंत्रपणे केंद्रे सुरू करण्यात यावीत. तसेच संत रविदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळावर अध्यक्ष व संचालक मंडळ नेमण्यात यावे आणि संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळात असलेले कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरील कर्मचारी रद्द करून चर्मकार समाजाच्या मुलांना प्राधान्य देण्यात यावे. तसेच संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाला मुंबई येथे प्रशस्त मुख्य कार्यालय देण्यात यावे, चर्मकार समाजाचा आयोग सुरू करून त्यावर अध्यक्ष नेमण्यात यावा, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळास कर्ज प्रकरणासाठी असलेल्या जाचक अटी रद्द करून अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवर कर्ज प्रकरणी त्वरित मंजूर करण्यात यावीत. तसेच संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्यावतीने प्रलंबित असलेले कर्ज प्रकरणे त्वरित निकाली काढण्यात यावीत. जर संत रोहिदास सर्वोद्योग व चर्मकार विकास महामंडळाला प्रत्येक जिल्ह्यात अद्ययावत असे कार्यालय देऊन जिल्हा व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांची भरती करण्यात यावी. तर मुंबईसह राज्यातील गटई कामगारांना पीच परवाने त्वरित देण्यात यावेत. तसेच राज्यातील गटई कामगारांना गटई स्टॉलचे त्वरित वाटप करण्यात यावे. तसेच चर्मकार समाजातील विद्यार्थ्यांना अस्वच्छ व्यवसायाची शिष्यवृत्ती त्वरित देण्यात यावी व राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये संत रविदास भवनसाठी जागा उपलब्ध करून भवन बांधून देण्यात यावे. त्याबरोबरच 2 लाख रुपयांपर्यंतची कर्ज प्रकरणे मंजूर करण्याचे अधिकार जिल्हा व्यवस्थापकांना देण्यात यावेत. तर संत रोहिदास विकास महामंडळाच्या कर्जाच्या जामीनाबाबतच्या जाचक अटी रद्द करण्यात याव्यात. तसेच राष्ट्रीय चर्मकार महासंघ चर्मकार समाजाच्या सामाजिक, आर्थिक व उद्योग विकासासाठी गेल्या 28 वर्षांपासून सातत्याने महाराष्ट्रात कार्यरत आहे. त्यामुळे या राज्य महासंघासाठी मुंबई येथे कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी आदी मागण्यांसाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.  या मोर्चामध्ये जास्तीत जास्त चर्मकार बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष नितीन शेरखाने यांनी केले आहे.

 
Top