उमरगा (प्रतिनिधी)-उमरगा येथील पोलीस निरीक्षक डी .बी पारेकर यांची अचानक उचलबांगडी झाल्यानंतर काल रात्री दि. 5 रोजी जिल्ह्यात दबंग पोलीस अधिकारी म्हणून ओळख असलेल्या तसेच लाचलुचपत प्रतिबंधक खात्यामध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या अश्विनी भोसले रुजू झाल्याने उमरगा तालुक्याच्या पहिल्या महिला पोलीस निरीक्षक अधिकारी असल्याचा मान त्यांना मिळाला आहे. 1999 साली पोलीस उपनिरीक्षक म्हणून धाराशिव जिल्ह्यात त्या रुजू झाल्या त्यांनी धाराशिव जिल्ह्यात जिल्हा विशेष शाखा, लाचलुचपत प्रतिबंधक शाखा ,सोलापूर शहर फौजदार चावडी पोलीस ठाणे, त्यानंतर तीन महिन्यापासून पोलीस अधीक्षक यांच्या वाचक म्हणून काम पाहिले आहे. जिल्हा विशेष शाखेत असताना मागील काही वर्षांपूर्वी उमरगा चौरस्ता येथे त्यांनी एका जुगार अड्ड्यावर केलेल्या कार्यवाहीमुळे काही राजकीय बड्या नेत्यावर दबंग स्टाईलने कारवाई केली होती. आता त्या स्वतः येथे पोलीस निरीक्षक पदाचा पदभार सांभाळणार असल्याने चर्चेला उधान आले आहे.

उमरगा पोलीस ठाण्याचा कार्यभार त्यांनी स्वीकारला असला तरी त्यांच्यासमोर अनेक आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. उमरगा तालुका हा सिमावर्ती भागातील महत्वाचा तालुका आहे. कर्नाटक राज्याला तसेच तीन प्रमुख जिल्हयांना जोडला गेला असल्याने अनेक  काळाबाजार करणाऱ्यांचे तसेच तस्करांचे माहेरघरच आहे. मुंबई -हैद्राबाद हा महामार्ग तालुका व शहरातुन गेल्याने शहर व तालुक्याला थोडी बहुत सुबत्ता प्राप्त झाली आहे. हा महामार्ग  व्यवसायीकांसाठी जसा महत्वाचा, जिवणवाहीणी म्हणुण ओळखल जातो  तसेच त्याची दुसरी बाजु भयानक आणि विदारक चित्र समोर आणते. अवैध गांजा, गुटखा, दारू, मांस, शासकीय तांदुळ गहु याची बिनधास्त व राजरोस तस्करी सर्रास होताना दिसते. 

याशिवाय उमरगा शहर व तालुक्यात सामान्य नागरिकांना वाढती गुन्हेगारी,दादागिरी, खुन,चोऱ्या यामुळे जगणे कठीण झाले आहे. वाहन गाडी चोऱ्यांचे प्रमाण वरचेवर वाढत असून गुन्ह्याचे उकल होण्याचे प्रमाण मात्र अत्यंत आहे. उमरगा शहरातील नागरिकांनी स्वखर्चातून उभारलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा युनिटचे जाळे बंद पडल्यानंतर प्रशासनानमार्फत मात्र याकडे साथ दुर्लक्ष करण्यात आले आहे. मुलींच्या छेडछाडी व अल्पवयीन मुलींचे पळून जाण्याचे प्रमाण वाढतच चाललेले आहे यावर पिंक पथक सक्रिय करण्याची आवश्यकता आहे.


13 महिन्यांच्या वर अधिकारी टिकेना

उमरगा तालुक्यात पोलीस निरीक्षक पदावर येणारा एकही अधिकारी सन 2019 पासून 6 वर्षात आजतागायत तेरा महिन्याचा कार्यकाळ पूर्ण करू शकला नाही . या काळात आठ अधिकाऱ्यांनी आपले कर्तव्य उमरगा पोलीस ठाण्यात बजावले, त्यापैकी चार अधिकाऱ्यांची तर दोन ते तीन महिन्याच उचल बांगडी करण्यात आली . शासन प्रशासनाला अधिकाऱ्यांच्या बदल्या करणे नित्याचेच झाले असले तरी याचा परिणाम वाढत्या गुन्हेगारी वर होत असून अधिकाऱ्यांना वातावरण परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येईपर्यंत त्यांची बदली केली जात असल्याने गुन्हेगार, चोरटे, खुनी मात्र सैराट होताना दिसत आहेत.

 
Top