धाराशिव (प्रतिनिधी) - खरीप 2023 मध्ये पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांना 25 % अग्रिम भरपाई मिळाली असून इतर 25 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना नुकसानी प्रमाणे विमा मिळाला आहे. मात्र 32 मंडळातील शेतकरी अद्याप वंचित असून 15 ऑगस्ट नंतर दिल्लीत त्यासंबंधी बैठक घेण्यात येणार आहे. त्यामुळे केवळ कोंड गावातीलच नव्हे तर जिल्ह्यातील आणि देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांनाही त्याचा लाभ मिळवुन देण्यासाठी प्रयत्न आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून देशाचे कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याशी बोलणे झालेले असून त्यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करीत असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.
धाराशिव तालुक्यातील कोंड येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व उदघाटन प्रसंगी आमदार राणाजगजितसिंह पाटील बोलत होते. जिल्हयातील विकास कामांसाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. शेतकर्यांरना केवळ एक रूपयात पीकविमा देण्याची योजना सरकारने आणली. यामुळे एकट्या कोंड गावातील शेतकर्येांचे या योजनेमुळे जवळपास 15 लाख रूपये राज्य शासनाने वाचविले आहेत. शाश्वत सिंचनासाठी साडे अकरा हजार कोटी रूपयांचा निधी कृष्णा मराठवाडा प्रकल्पास मंजूर करण्यात आला आहे. संपूर्ण जिल्ह्याची ओळख बदलनाऱ्या या प्रकल्पाचा पहिला टप्पा काही दिवसांत पूर्णत्वास जाणार आहे. माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या दूरदृष्टी मुळेच असे प्रकल्प मार्गी लागत आहेत. राज्य शासनाकडून हे प्रकल्प प्राधान्याने पूर्णत्वास नेले जात आहे. यामुळे जिल्ह्याची नवी ओळख निर्माण होऊ शकेल, असे मतही आमदार पाटील यांनी व्यक्त केले.
सदरील कार्यक्रमास ॲड. रामेश्वर शेटे, माजी सभापती दत्ता देवळकर, बाळासाहेब खांडेकर, ग्रा.प. सदस्य राहुल जाधव, संजय पाटील, अनुरथ भोसले, अशोक भूमकर, बाळु गिरी, दत्ता गायकवाड, प्रवीण शेटे, विश्वास पाटिल, उमाकांत भुमकर, विष्णु लोंढे, शंकर सर्जे, महादेव जाधव, सुमित पाटील, किशोर सर्जे यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.