धाराशिव (प्रतिनिधी) - पत्रकार सर्वसामान्यांच्या बातम्यांना शासन व प्रशासन दरबारी मांडून त्यांना न्याय देण्याचे काम करतो. मात्र पत्रकारांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो विशेष म्हणजे त्यांची आर्थिक बाजू सक्षम नसल्यामुळे त्यांचे आर्थिक स्त्रोत वाढला पाहिजे. तसेच 60 वर्षानंतर पत्रकारांना किमान व्यवस्थित जगता यावे यासाठी पेन्शन मिळणे आवश्यक आहे. मात्र त्यासाठी जाचक अटी लादल्या आहेत. त्या अटी शिथिल करण्यात याव्यात अशी मागणी व्हाईस ऑफ मीडियाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष विजय चोरडिया यांनी दि.7 ऑगस्ट रोजी केली. दरम्यान शिर्डी येथे दि. 31 ऑगस्ट व 1 सप्टेंबर असे दोन दिवशीय होणाऱ्या पत्रकारांच्या अधिवेशनास सर्व पत्रकारांनी उपस्थित रहावे असे आवाहन त्यांनी केले.

शिर्डी अधिवेशनच्या निमित्ताने धाराशिव शहरातील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे, मराठवाडा उपाध्यक्ष आप्पासाहेब शिंदे, जिंतूर तालुकाध्यक्ष भागवत चव्हाण आदी उपस्थित होते. 

पुढे बोलताना चोरडिया म्हणाले की, पत्रकारांना कुठल्या प्रकारची सुरक्षा नसल्यामुळे ते असुरक्षित असून त्यांची राज्यस्तरावर पत्रकारांची 10 लाख रुपयांची विमा पॉलिसी उतरविण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. तर अधिस्विकृतीसाठी 10 वर्ष पत्रकारिता केली असल्याचा अनुभव ग्राह्य धरून सरसकट पत्रकारांना अधिस्विकृती देण्यात यावी अशी आग्रही मागणी त्यांनी केली. तसेच शंकरराव चव्हाण कल्याण निधीच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या पेन्शनच्या अटीमध्ये सलग 30 वर्षे एका दैनिकात काम करणे ही अट रद्द करावी व 20 वर्ष पत्रकारितेची सेवा ग्राह्य धरावी असे त्यांनी सांगितले. यावेळी मल्लिकार्जुन सोनवणे, अमजद सय्यद, आकाश नरोटे, वैभव पारवे, शितल वाघमारे, सलीम पठाण, कुंदन शिंदे, जफरोद्दीन शेख, किशोर माळी आदींसह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

 
Top