धाराशिव (प्रतिनिधी)- ऑक्टोबर महिन्यात दि. 3 ते 18 या कालावधीत श्री.तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र महोत्सव होणार आहे.यादरम्यान विविध विभागाकडून यात्रेत व्यवस्था करण्यात येते.ही यात्रा व्यवस्था उत्तम असण्यासह महोत्सवादरम्यान भाविकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता यंत्रणांनी घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिले.
श्री. तुळजाभवानी मंदीर संस्थान सभागृह, तुळजापूर येथे आगामी शारदीय महोत्सवासाठी 23 ऑगस्ट रोजी आयोजित आढावा बैठकीत डॉ. ओंबासे बोलत होते. यावेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष, पोलिस अधिक्षक संजय जाधव,उपविभागीय अधिकारी श्री.संजय डव्हाळे, अतिरिक्त पोलिस अधिक्षक गौहर हसन, उपविभागीय अधिकारी संजय डव्हाळे, उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश देशमुख, तहसीलदार अरविंद बोळंगे, तुळजाभवानी मंदीर प्रशासकीय व्यवस्थापक तथा तहसीलदार माया माने, सहाय्यक धार्मिक व्यवस्थापक सिध्देश्वर इंतुले यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ.ओंबासे म्हणाले की, येणाऱ्या भाविकांना विविध सुचना देण्यात येवून तुळजापूरकडे येणाऱ्या सर्व रस्त्यावर महामार्गावर तसे फलक लावण्यात यावे.शहरात अनेक रिक्षा अनधिकृत असून त्या गॅसवर चालविण्यात येतात. यामुळे अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे. तसेच प्रवाशांची फसवणूक होणार नाही यासाठी रिक्षांचे दरपत्रक रिक्षा स्टँडवर लावण्यासह प्रवाशांची संख्या निश्चित करावी. संभाव्य अपघाताच्या ठिकाणी प्रतिबंधात्मक कारवाईच्या सुचना यावेळी त्यांनी सहाय्यक प्रादेशिक अधिकारी यांना दिल्या.
शारदीय नवरात्र महोत्सवादरम्यान विद्युत पुरवठा खंडीत होणार नाही या दक्षतेसह या काळात एक उपअभियंता व दोन वायरमन यांची स्वतंत्रपणे नियुक्ती करण्यासह मंदीरासाठी करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठयाचा विजपुरवठा खंडीत होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश देऊन डॉ.ओंबासे म्हणाले, ट्रान्सफार्मरवर येणारा लोड क्षमतेपेक्षा जास्त नसावा. शहरातील विजेचे केबल,बॉक्स,मेन बॉक्स उघडे राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी. महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने बसेसची व्यवस्था करुन बसमुळे वाहतूक विस्कळीत होणार नाही याची दक्षता घ्यावी.इतर सर्व विभागांना नेमून दिलेली कामे वेळेत पूर्ण करुन भाविकांची गैरसोय होणार नाही. यांची दक्षता घेण्याच्या सुचना यावेळी दिल्या. यावेळी पोलिस निरीक्षक रवींद्र खांडेकर, तुळजापूरचे आगार व्यवस्थापक रामेश्वर शिंदे, मंदीर संस्थानचे अधिकारी, कर्मचारी तसेच विविध यंत्रणांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
कुंकूवाऐवजी उधळण्यात येणार फुले
शारदीय नवरात्र महोत्सवाचा सिमोल्लंघन हा महत्वाचा उत्सव असतो. सिमोल्लंघनावेळी काही मंदीर पालखीवर पोत्याने कुंकू उधळल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण होते.यामुळे आता पालखीवर कुंकूऐवजी फुले उधळण्यात येणार आहेत.