धाराशिव  (प्रतिनिधी) - आगामी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी ओबीसी बहुजन पार्टी सज्ज झाली आहे. या पार्टीच्या माध्यमातून राज्यभरातील सर्व जागेवर उमेदवार उभे करणार असल्याची माहिती ओबीसी बहुजन पार्टीचे प्रदेश चिटणीस अरुण जाधवर यांनी दि.१० ऑगस्ट रोजी दिली.


धाराशिव शहरातील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ओबीसी बहुजन पार्टी जिल्हा सचिन नाना शेंडगे, जिल्हा कायदेशीर सल्लागार शरद राठोड व नामदेव वाघमारे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना जाधवर म्हणाले की, ओबीसींची जिल्ह्यामध्ये साडेबारा लाख तर राज्यामध्ये आठ कोटी संख्या असल्याचे त्यांनी सांगितले. ओबीसी बहुजन पार्टीकडून लढण्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात २ - ३ उमेदवारांनी पार्टीकडे उमेदवारी मागणीचे प्रस्ताव आले आहेत. त्या संदर्भात मुंबई येथील मुख्यालयामध्ये पुढील आठवड्यात बैठक होऊन त्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. आमची वंचित बहुजन आघाडी व एआयएमआयएम या पक्षासोबत यूती करण्या संदर्भात वरिष्ठ स्तरावर बोलणी सुरु आहे. त्याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच माळी, धनगर व वंजारी अर्थात माधव या घटकांची सर्वच पक्षांनी विशेषतः भारतीय जनता पार्टीने आजपर्यंत वापर करून घेतला. मात्र या जाती समूहाच्या कल्याणासाठी सत्ताधारी पक्षाने कोणतीच भूमिका घेतली नसल्याचा आरोप करीत त्यांनी भाजपवर निशाणा साधला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार व पार्टी नवीन असल्यामुळे मतदारापर्यंत पोहोचण्यास आम्हाला अपयश आले हे खरे असले तरी ती चूक या विधानसभा निवडणुकीत होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीत त्या त्या मतदारसंघातील सामाजिक व इतर सर्व प्रकारच्या प्रश्नांची जाण असलेले व सुशिक्षित उमेदवारांनाच तिकीट दिले जाणार असल्याचे जाधवर यांनी नमूद केले.


धाराशिव जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची आज शासकीय विश्रामगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला मोठा प्रतिसाद मिळाला आहे तसेच धाराशिव जिल्ह्यातील चारही मतदारसंघात ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार विजयी होतील अशी प्रतिक्रिया जिल्हाध्यक्ष सचिन नाना शेंडगे यांनी दिली आहे.

 
Top