कळंब (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्यातील वाशी, कळंब परिसरात शनिवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसाने नदी नाले तुडुंब भरून वाहु लागले आहेत. त्यातच संगमेश्वर प्रकल्पतील विसर्ग वाढल्याने मांजरा नदीला अचानक महापुर आला. बीड, धाराशिव जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या फक्राबाद (ता. वाशी ) च्या मांजरा नदीवरील अरुंद पुलावरील पुरामुळे रस्त्यासह पुल वाहुन गेला आहे. गावचा रात्रीचाच संपर्क तुटला. यामुळे गावकऱ्यांना नेहमीप्रमाणेच याचा मोठा फटका बसला असून गावकऱ्यांना नदीकाठीच आसरा घेउन मुक्काम ठोकावा लागला. ही आठवड्यातील गावचा संपर्क तुटण्याची दुसरी वेळ आहे. शेती शिवारात पुराचे पाणी घुसल्याने सोयाबीनची पिके पाण्यात गेली आहेत.
धाराशिव, बीड, लातुर जिल्ह्याची तहान भागवणारा मांजरा प्रकल्प उगम भागातील जोरदार पावसामुळे मांजरा नदीला आलेल्या महापुरामुळे भरण्याच्या प्रतिक्षेत आहे. धाराशिव आणि बीड जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या फक्राबाद (ता वाशी) गावची लोकसंख्या दोन हजाराच्या आसपास आहे. मांजरा नदी पात्राजवळच हे गाव वसल्याने या गावाला जाण्यासाठी एकच रस्ता आहे. मांजरा नदीला पुर आला की पावसाळयात या गावचा संपर्कच तुटतो. अचानक अतिवृष्टी झाल्याने या गावचा संपर्क तुटुन एक वृद्ध महिलेचा वाहुन जावुन मृत्यु झाला होता. पावसाळयात जनावरे वाहुन जाण्याचे प्रकार तर नित्याचेच झाले आहेत. मांजरा नदीवरील अरुंद पुलाचा फटका या गावकऱ्यांना बसतो व गावचा संपर्कच तुटतो. यामुळे आजारी रुग्णांना उपचारासाठी घेउन जाणे दुरापस्त होते. नदी नाले व अरुंद पुल हे गावच्या जणु मुळावरच उठल्यागत होतात. परंतु शनिवारी झालेल्या जोरदार पावसामुळे मांजरा नदीला महापुर आला असुन याचा फटका फक्राबादला बसला आहे. नदीवरील पुलावरून पाणी शेतीत घुसले व चक्क पुलासह रस्ताच वाहुन गेल्याने याचा मोठा फटका गावकऱ्यांना बसला आहे. या गावचा संपर्क तुटला आहे. यामुळे पारगाव, वाशी, कळंब या भागाचा संपर्क तुटला आहे.
आपत्ती व्यवस्थापण व्यवस्था करतेय काय!
प्रत्येक वर्षी मांजरा नदीला पुर आल्यास मांजरा नदीवर वसलेले फकाबाद ता. वाशी हे गाव संपर्कापासुन तुटते. या मुळे गावकरी अक्षरशाः वेतागुन गेले आहेत. पावसाळ्यात आपत्ती व्यवस्थापन पाहणी करते परंतु दुसऱ्या पावसाळयातच याकडे पाहिले जाते. परंतु आता तर गावाशी संपर्क असलेला एकमेव अरुंद पुल रस्त्यासह वाहुन गेल्याने गावचा संपर्कच तुटला आहे. गेल्या अनेक वर्षापासुन गावकरी पुलाची उंची वाढवावी अशी मागणी करत असल्याचे अँड. दत्तात्रय मुरकुटे यांनी सांगीतले. परंतु प्रशासन याकडे लक्ष देत नाही. यामुळे गावकऱ्यांचा संताप अनावर झाला आहे. पुर आल्यानंतर गावच्या बाहेरच नदीकाठी लोक अडकतात. मिळेल त्या ठिकाणी आसरा घेतात. त्यामुळे आता तरी प्रशासनाने याकडे लक्ष घालण्याची गरज आहे असेही ते म्हणाले.