धाराशिव (प्रतिनिधी)- श्रावणमासा निमित्त आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी प्रमाणे यावर्षीही महिलांसाठी जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्यावतीने देवस्थान दर्शन यात्रा आयोजित करण्यात आली होती. यावेळी श्री सप्तश्रृंगी गड, रेणुका माता, आणि नाशिक येथील त्र्यंबकेश्वर येथे दर्शन सहल आयोजित करण्यात आली. यास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. इतक्या मोठ्या संख्येत महिला असलेली ट्रिप सुरू झाली आणि प्रत्येक महिलेने मनमुराद आनंद लुटला.
सदरील दर्शन यात्रा दि.28/08/2024 रोजी प्रतिष्ठान भवन, धाराशिव येथून पहाटे निघाली होती रात्रीपर्यंत या महिलांनी या सहलीचा आनंद लुटला. धाराशिव शहरातील छत्रपति शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून सहलीची सुरुवात झाली. यावेळी धाराशिव तालुक्यातील प्रमुख पदाधीकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. श्रावण महिन्यानिमित्त यावेळी धाराशिव तालुक्यातील भाविक महिलांना श्री सप्तृंगी गड वणी, चांदवड येथील रेणुका माता, नाशिक येथील त्र्यंबकेश्वर येथे दर्शनाची संधी उपलब्ध करून दिली होती. यासाठी 8 बसेसची सोय करण्यात आली.
श्री सप्तश्रृंगी गड नाशिक पासुन 60 कि.मी अंतरावर कळवण तालुक्यात स्थित आहे. देवीचे मंदिर 7 शिखरांनी वेढलेले असुन समुद्रसपाटीपासुन 4659 फुट उंचीवर आहे. यास महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी ‘'अर्ध शक्तीपीठ” मानले जाते. देवीची आठ फुट उंचीची मुर्ती पाषाणात कोरलेली असुन दोन्ही बाजुस 9 असे एकुण 18 हात व त्यात विविध आयुधे असलेली आहे. या ठिकाणी माता भगवती निवास करते. ‘'सप्तृंग” हया शब्दाचा अर्थ ‘'सातशिखरे” असा आहे. सप्तश्रृंगी देवीचे दर्शन झाल्यानंतर शेकडो महिलांसह नजीकच्या चांदवड येथील रेणुका माता, नाशिक येथील त्र्यंबकेश्वर येथेही घेतले. यामुळे महिलांचा आनंद द्विगुणित झाला.
या सहली निमित्त महिलांची हितगुज करताना मा. सौ. अर्चनाताई पाटील म्हणाल्या की देवदर्शन एक निमित्त आहे, देवदर्शन आपण आपल्या गावात सुद्धा करू शकतो. पण महिलांना कधीही घराच्या बाहेर पडून स्वतःसाठी आनंद घेता येत नाही. त्यामुळे मी दरवर्षी अशा सहलीचे नियोजन करते. आणि त्यानंतर महिलांमधून ज्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया येतात, त्या जो आनंद घेतात, त्यामुळे माझा स्वतःचा आनंद द्विगुणीत होऊन पुन्हा पुन्हा अशा सहलीचे नियोजन करावे असे माझ्या मनामध्ये सतत येत राहते. यंदाच्या या ट्रीपला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आम्ही स्वतः सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात महिला घेतल्यामुळे सांशक होतो की महिला कसा प्रतिसाद देतील, परंतु महिलांनी इतका सुंदर या सहलीचा आनंद लुटला कुठल्याही प्रकारे गालबोट न लागता निर्विघ्नपणे महिलांना सुखरूप घरी सोडल्याचे माझ्या मनामध्ये समाधान आहे. अशीच सहल तुळजापूर तालुक्यातील महिलांसाठी दर्शन सहल आज 30 सप्टेंबर रोजी निघणार असून त्यालाही असाच उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा.
या सहलीमध्ये सहभागी झालेल्या महिलांनीही अर्चनाताई च्या माध्यमातून आपल्याला सहलीचा पहिल्यांदाच आनंद घेता आला व आपण सहल कशी असते हे पाहिल्याचे जाणीवपूर्वक नमूद केले. यावेळी देवस्थान प्रशासनाच्या वतीने अर्चनाताई पाटील यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.