धाराशिव (प्रतिनिधी)- शासनमान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेची बैठक श्री यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद धाराशिव येथे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष व सर्व खाते प्रमुख समवेत संपन्न झाली. या बैठकीत दिव्यांग कर्मचाऱ्यांचे सर्व प्रश्न एक महिन्याच्या आत निकाली काढणार असल्याचे घोष यांनी सांगितले. 

यामध्ये 1996 पासून दिव्यांगाचा पदोन्नती मधील अनुशेष भरून काढणे, जून 2016 पासून पदोन्नती मधील चार टक्के अनुशेष भरून काढणे, दिव्यांग कर्मचाऱ्यांना सहाय्यक तंत्रज्ञान व उपकरणे पुरवणे,  दिव्यांग शिक्षकांची यापूर्वी फेर तपासणी झाली त्याची सेवा पुस्तिका मध्ये नोंद घेणे, दिव्यांग कर्मचारी संघटनेस कार्यालयासाठी खोली उपलब्ध करून देणे, दिव्यांग सेवा जेष्ठता यादी तयार करणे, आदर्श दिव्यांग शिक्षक आदर्श दिव्यांग कर्मचारी पुरस्कार देणे, दिव्यांग तक्रार निवारण समिती स्थापन करणे, दिव्यांग कक्ष स्थापन करणे यासह विविध विषयावर सकारात्मक चर्चा झाली. संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष महादेव शिंदे यांनी सविस्तर विषय मांडले त्याला सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. 

एक महिन्यात सर्व प्रश्न निकाली काढू असे जिल्हा परिषद प्रशासनाने संघटनेला आश्वासित केले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुधा साळुंखे, प्राथमिक शिक्षणाधिकारी अशोक पाटील यांच्यासह सर्व खाते प्रमुख उपस्थित होते. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महादेव शिंदे, नागेश कदम, रमेश वाघमारे, महादेव विटकर यांच्यासह अनेक पदाधिकारी पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.

 
Top