तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील रहिवाशी व सध्या सांगली येथील लेखिका  प्रतिभा पद्माकर जगदाळे यांच्या “मुक्ता“ या कादंबरीचा “कर्नाटक विद्यापीठ, धारवाड“ येथील बी. ए. भाग दोन च्या अभ्यासक्रमात समावेश झालेला आहे. तसे पत्र कर्नाटक विद्यापीठ, धारवाड, येथील मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. यशवंत राऊत यांनी दिले आहे.

“मुक्ता“ या कादंबरीत स्त्री जीवनाचा लेखाजोखा मांडलेला आहे. पूर्वापार चालत आलेली आपली पुरुषकेंद्री व्यवस्था आणि त्यामुळे स्त्रियांवर होणारा अन्याय, तसेच स्त्रीची  कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक, धर्म, रूढी, परंपरा वगैरे मध्ये होणारी कोंडी आणि घुसमट आणि यातून तिने जिद्दीने काढलेला मार्ग, यात मांडलेले आहे. तसेच तिची समाजाविषयीची तळमळ, सामाजिक बांधिलकी, केलेले कार्य या कादंबरीत आलेले आहे. स्त्री जीवनाचे अनेक कंगोरे या कादंबरीमध्ये दिसून येतात.

प्रतिभा जगदाळे यांचे ललित लेखसंग्रह, चरित्रग्रंथ, विनोदी लेखसंग्रह, काव्यसंग्रह, बाल काव्यसंग्रह वगैरे लेखन प्रकाशित झालेले आहेत.“ मुक्ता “या कादंबरीचा अभ्यासक्रमात समावेश करून कर्नाटक विद्यापीठाने स्त्रियांप्रति आदर आणि पुरोगामी दृष्टिकोन दाखवून दिला आहे.

 
Top